Thu, Apr 25, 2019 23:36होमपेज › Marathwada › एखादा पुरस्कार शेवटचाच समजून लोकं जल्लोष करतात : पंकजा मुंडे

एखादा पुरस्कार शेवटचाच समजून लोकं जल्लोष करतात : पंकजा मुंडे

Published On: Apr 21 2018 4:55PM | Last Updated: Apr 21 2018 5:07PMपरळी वैजनाथः प्रतिनिधी 

एखाद्या पुरस्काराने प्रोत्साहन मिळेलही पण तो पुरस्कार शेवटचाच समजून लोक मोठा खर्चिक जल्लोष करतात असा टोला मंत्री पंकजा मुंडें यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना नाव न घेता लगावला. परळीत धनंजय मुंडे यांच्यासाठी आयोजित केलेल्या नागरी सत्कार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमास योगदान द्यावे असे आवाहन करताना त्यांनी जल्लोषबाजीवरील खर्च कमी करावा असे सांगितले.  

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझे मोठे बॅनर लावून शहर सजवू नये तसेच जाहिरातीवरही खर्च करू नये. करायचचं असेल तर पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमास योगदान द्यावे. सध्या सर्वत्र कडक उन्हाळा असल्याने त्याच्या झळा ग्रामीण भागाला सर्वाधिक बसत आहेत. बहुतांश भागात पाणी टंचाईने जनता हैरान झाली आहे. अशा परिस्थितीत पाण्यासाठी काम झाले पाहिजे, पाणी फाऊंडेशन त्यासाठी जोमाने कामाला लागले आहे.

लोक त्यांच्या श्रमदानात स्वतःहून सहभागी होत आहेत. आपल्या कार्यकाळात जसा जलयुक्त शिवार योजनेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता आणि ती योजना यशस्वी झाली होती. अगदी तसाच सहभाग पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात देण्याची गरज आहे.  

काहीजण मोठ-मोठे बॅनर लावून शहर सजवतात, जाहिरातबाजीवर मोठा खर्च करतात पण हया सगळ्यावर खर्च करण्याऐवजी पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात योगदान दिले तर ते सर्वांच्याच हिताचे ठरेल. त्यासाठी सर्वानी एकजुटीने मदत करावी असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. 

दरम्यान पंकजा मुंडे यांच्या या प्रसिद्धी पत्रकानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून यामध्ये ना. पंकजा मुंडे यांनी आगोदर चिक्की घोटाळ्यातील खाल्लेले किमान अर्धे 103 कोटी रूपये पाणी फाउंडेशनला द्यावे असा टोला लगावला आहे. पालकमंत्र्यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड.गोविंद फड, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी प्रतिउत्तर दिले आहे. 

Tags : pankaja munde, indirect comment, dhananjay munde, award celebration , marathawada news