Thu, Jul 18, 2019 21:43होमपेज › Marathwada › तर मंत्र्यांना झोडपून काढू : 'स्‍वाभिमानी'ची तंबी

तर मंत्र्यांना झोडपून काढू : 'स्‍वाभिमानी'ची तंबी

Published On: Feb 15 2018 2:48PM | Last Updated: Feb 15 2018 2:48PMलातुर : प्रतिनिधी

अनेक अडचणींनी शेतकरी संकटात सापडला आहे. अशावेळी त्याला भक्कम आधार न देता  भुल- थापा देऊन त्याची फसवणूक करणाऱ्या मंत्र्यांना यापुढे  झोडपून काढू, अशी तंबी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी लातूर येथे दिली.

गारपीटग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आलेल्या खासदार शेट्टी यांनी विश्राम गृहावर शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्‍यांनी शेतकऱ्यांना बुडवणारे व व्यापाऱ्याला पोसणारे सरकारचे धोरण आहे. शेतकऱ्यांनी माल विकल्यास हमीभाव केंद्र सुरू केली आहेत. साखर उत्पादन वाढणार असल्याचे भासवत साखरेचे भाव पाडले गेले आहेत. आयात कर वाढवल्याने परदेशातून चिमुटभरही साखर आयात होणार नाही. साखरेच्या पडलेल्या दराचा किरकोळ बाजारातील साखरेच्या किमतीवर काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे यामध्ये काळेबेरे असून त्यात राज्यातील काही साखर रखानदारांचाही त्यात समावेश असल्याचे सांगितले. गेल्‍या दोन महिन्यात ज्यांनी साखर विकली व खरेदी केली अशांची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. गारपीटग्रस्त  बागायती शेतीसाठी  एकरी ५० हजार व जिरायतीसाठी एकरी १५ हजार रुपये मदत देण्याचीही मागणी त्यांनी केली. पत्रकार परिषदेस राज्य प्रवक्ते सत्तार पटेल, कोल्हापुरचे जिल्हाध्यक्ष जालंदर पाटील, अरुण कुलकर्णी , धर्मराज पाटील विजय जाधव आदीची उपस्थिती होती.

मोदीजी जमीनतरी हिसकावू नका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होऊ घातलेला खेत पे चर्चा हा कार्यक्रम चाय पे चर्चा सारखाच फसवा, असेल अशी टीका खासदार शेट्टी यांनी केली. ज्या विर्दभातील एका गावातून मोदींनी चाय पे चर्चा सुरू केली. तिथे एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही, अशा शब्द दिला. परंतु मोदींची पाठ फिरताच त्या गावातील १४ शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले. त्या गावाची आठवणही आता मोदींना येत नाही. चाय पे चर्चने शेतकऱ्यांच्या हातातील चहाचा कपही हिसकावला आता खेत पे चर्चेतून शेतकऱ्याची जमीन तरी हिसकावू नये, अशी मार्मीक टोलेबाजी शेट्टी यांनी केली.