Fri, Jul 03, 2020 21:55होमपेज › Marathwada › धारूर : खून प्रकरणात माजी नगराध्यक्षांच्‍या पतीचा हात

धारूर : खून प्रकरणात माजी नगराध्यक्षांच्‍या पतीचा हात

Published On: Aug 13 2019 5:18PM | Last Updated: Aug 13 2019 5:06PM

नामदेव शिनगारे प्रतिनिधी : धारूर

मुलीच्या लग्नाला दिलेल्या पैशाची मागणी केल्याच्या कारणावरून धारुर येथील माजी नगराध्यक्षा सविता शिनगारे यांचे पती नामदेव शिनगारे यांचा खून  झाल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास धारुर शहरापासून २ किमी अंतरावर घडली. हा खून दुसऱ्या माजी नगराध्यक्षांच्‍या पतीसह तिघांनी केल्याचे समोर आले आहे. मृताच्‍या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून धारूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीस अटक करावे म्हणून मंगळवारी दुपारपर्यंत बाजारपेठ बंद ठेवली होती. नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

धारूर येथील माजी नगराध्यक्षेचे पती नामदेव शिनगारे यांचा सोमवारी चार वाजण्याच्या सुमारास केज रोड लगत असलेल्या सोयाबीनच्या शेतात दगडाने डोक्यात मारून खून केल्याची घटना घडली होती. 

सुखदेव प्रभाकर फुन्ने यांना मुलीच्या  लग्नाला दिलेले एक लाख रुपये मागण्याच्या कारणावरून नामदेव शिनगारे यांना काही जणांनी मिळून शेतात नेऊन लाथा, बुक्याने मारहान करून डोक्यात दगड घालून ठार मारले. तसेच गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मयत शिनगारे यांची मोटार सायकल एक किमी अंतरावर स्मशान भूमीत टाकली.  

या प्रकरणी मृताचा मुलगा सुदर्शन शिनगारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुखदेव प्रभाकर फुन्ने, गणेश शिवाजी घोडके, सुभाष तुकाराम शिंदे तिघे (रा. धारूर) यांच्यासह अज्ञात तिघांच्‍याविरोधात धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील गणेश घोडके व सुभाष शिंदे यास अटक करण्यात आली आहे. मात्र सुखदेव फुन्ने हे फरार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक सुरेश माळी करीत आहेत.