Sun, Apr 21, 2019 00:08होमपेज › Marathwada › पोटच्या मुलालाच आईने चालत्‍या बसमधून फेकले 

पोटच्या मुलालाच आईने चालत्‍या बसमधून फेकले 

Published On: Mar 09 2018 4:06PM | Last Updated: Mar 09 2018 4:06PMपरळी वैजनाथ /प्रतिनिधी

चालत्या बसमधून आपल्या पोटच्या एक वर्ष वयाच्या मुलाला आईनेच बाहेर फेकून दिल्याची धक्‍कादायक घटना आज दि. ९ रोजी दुपारी १२.३० वा. च्या सुमारास घडली. परळी -पंढरपूर ही बस कन्हेरवाडी घाटाजवळ असताना ही  घटना घडली. या ह्रदयद्रावक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. जखमी मुलाला अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरळवाडी ता. गंगाखेड येथील रहिवासी महिला रेखा बाळासाहेब गेतगे ही परळी -पंढरपूर (बस क्र. एम.एच.१४ बी. टी. २११४) या बसमधून प्रवास करीत होती. उसतोडणी कामगार असलेल्या गेतगे कुटुंबातील लोक आपल्या गावाकडून पून्हा कारखान्याला जात होते. ही बस परळी बसस्थानका वरून निघून कन्हेरवाडी जवळच्या घाटात असताना या महिलेने खिडकीतून आपल्या प्रेम नावाच्या एक वर्ष वयाच्या मुलाला बाहेर फेकले. या वेळी चालक वैजनाथ राउत व वाहक भागवत रूपनर यांनी तत्परतेने गाडी थांबवली व या जखमी मुलास उपचारासाठी रूग्‍णालयात पाठवण्याचे प्रयत्न केले. रस्त्यावरून जाणाऱ्या रूग्णवाहिकेतून या मुलाला उपचारासाठी अंबाजोगाई येथील रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ही बस तातडीने ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली. या ठिकाणी या महिलेसोबत असलेल्या नारायण भक्तराम गेतगे यांनी जवाब लिहून दिला असून रेखा बाळासाहेब गेतगे ही मनोरूग्‍ण असल्याचे म्हटले आहे. गेल्या एक वर्षापासून ती मनोरुग्ण आहे तिच्यावर उपचार सुरू आहेत. वेडाच्या भरात तीने हे कृत्य केले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.