होमपेज › Marathwada › लातूर : बाभळगावाच्या गढीसमोर मराठा क्रांतीचा एल्गार

लातूर : बाभळगावाच्या गढीसमोर मराठा क्रांतीचा एल्गार

Published On: Aug 02 2018 12:13PM | Last Updated: Aug 02 2018 12:13PM लातूर : प्रतिनीधी

लातूर मराठा क्रांतीच्यावतीने बाभळगाव येथील आमदार अमित देशमुख यांच्या गढीसमोर आंदोलकांनी ठिय्या मारला आहे. एक मराठा लाख मराठा या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाकडे आमदार अमित देशमुख यांनी पाठ फिरवल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे.

याबाबात मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी पावणेअकराच्या सुमारास लातूर येथून शेकडो समाज बांधव बाभळगावला रवाना झाले. तिथे पोहोचल्यानंतर आमदार देशमुख यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशदाराजवळ घंटानाद करीत ठिय्या मारला. तसेच आमदार देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. आमदार अमित देशमुख यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत त्यांच्या या भूमिकेचा निषेध केला. दिवंगत विलासराव देशमुख यांनी शासकीय स्तरावर शिवजयंती तारखेप्रमाणे साजरी करण्यास मान्यता दिली. तथापि आमदार अमित देशमुख हे मात्र मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गंभीर नाहीत. त्याना समाजाच्या व्यसपीठावर येण्यास संकोच वाटतो. त्यांनी विलासरावांचे  गुण अंगिकारावेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. 

मराठा आरक्षणाचा प्रश्न सभागृहात जोरदारपणे लावून धरल्याबद्दल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे आभार मानण्यात आले. त्याचवेळी निष्क्रिय मराठा आमदाराचा जोरदार निषेध आंदोलकांनी केला. या आंदोलनात बाभळगावचे समाजबांधवही मोठ्या संख्येत सहभागी झाले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.