Fri, Jul 19, 2019 07:26होमपेज › Marathwada › पुस्तके महापुरुष जन्माला घालतात

पुस्तके महापुरुष जन्माला घालतात

Published On: Mar 02 2018 12:48AM | Last Updated: Mar 02 2018 12:29AMजालना : प्रतिनिधी

पुस्तकांचे जग हे फार सुंदर असते, त्यांच्या सहवासात राहिल्यानेच  आपण घडत असतो. पुस्तके महापुरुष जन्माला घालतात. भावनांना व साहित्यांना हा काळ बांधून ठेवू शकत नाही. भावना साहित्यात उत्कटपणणे येतात, असे प्रतिपादन लेखिका संजीवनी तडेगावकर यांनी केले. 

जेईएस महाविद्यालयात मराठी भाषा सप्ताह व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.  काबरा होते. यावेळी व्यासपीठावर लवटे, प्राचार्य राठी उपस्थित होते.

तडेगावकर म्हणाल्या, माणसाच्या हातून तयार होणारी साहित्यनिर्मिती कधीच मरत नसते. उत्कटपणे व्यक्त होणारे साहित्य कालातीत ठरत असते. जो लेखक, कवी आपल्या मनातले बोलतो, लिहितो तोच लेखक आपणास आवडत असतो. साहित्य माणसाला त्याच्या आकलनाबद्दलचे विविध पैलू शिकवत असते, असेही त्या म्हणाल्या. 
डॉ. काबरा म्हणाले, आपण परंपरेचे पाईक म्हणून मराठी भाषा व संस्कृतीचे जतन केले पाहिजे. आपण कितीही आधुनिक झालो तरी आपल्या परंपरेची आपण नाळ तोडू नये. मातृभाषा समृद्ध करण्यासाठी वाचन करणे व त्यातून व्यक्त होणे आवश्यक आहे. सर्वांनी वाचनाचा छंद लावून घेतला पाहिजे असेही काबरा म्हणाले. 

कुसुमाग्रज या विकास भित्तिपत्रक विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मानसी नाथ्रेकर यांनी मराठी भाषेबद्दल मनोगत व्यक्त केले. सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. मराठमोळ्या संस्कृतीने बैलगाडी सजवून भजन, पावल्या, फुगडी, टाळ- मृदंगाच्या गजराने महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला होता.