Wed, Jul 24, 2019 08:27होमपेज › Marathwada › मराठवाड्यात ठोक मोर्चाची तीव्रता वाढली; बसेस फोडल्या

मराठवाड्यात ठोक मोर्चाची तीव्रता वाढली; बसेस फोडल्या

Published On: Jul 20 2018 4:26PM | Last Updated: Jul 20 2018 4:27PMपरळी (जि. बीड) :  प्रतिनिधी

आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी परळी येथे मोर्चा काढल्यानंतर ठिय्या मांडणाऱ्या आंदोलकांच्या समर्थनासाठी जिल्हाभरात आंदोलने होत आहेत. सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरू असून या आंदोलनाची तीव्रता वाढली आहे.

शुक्रवारी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी अंबाजोगाई, गेवराई, केज, पिंपळनेर येथे आंदोलन करण्यात आले. माजलगाव येथे रास्तारोको दरम्यान दगडफेक झाल्याची घटना घडली असून यात काही वाहनांचे नुकसान झाले आहे. अंबाजोगाई येथेही एक बस फोडण्यात आली. आंदोलनाची तीव्रता वाढल्याने प्रशासनाची धावपळ उडत आहे. आंदोलक ठोस लेखी आश्वासनाच्या मागणीवर ठाम आहेत.


परभणीतही आंदोलन; 2 दिवसांत १० बस फोडल्या

मराठा समाजाच्या प्रलंबित आरक्षण प्रश्‍नावर राज्यभर आंदोलन करण्यात येत असून त्याचे पडसाद परभणीतही उमटले. १९ जुलै रोजी जिल्ह्यातील विविध ठिकाणी ६ बसेसची तोडफोड करण्यात आली. तर  आज आंदोलने व निदर्शने करण्यात आली. दरम्यान संतप्‍त झालेल्या युवकांनी घोषणाबाजी करुन सकाळी ११ ते १ वाजण्याच्या सुमारास शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चार बस  फोडल्या.  

मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलने करण्यात येत असल्याने त्याचे पडसाद जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पडण्यास सुरुवात झाली आहे. १९ जुलै रोजी गंगाखेड व परभणी आगारातील बस (क्र.एम.एच.20 बी.एल. 1695), गंगाखेड- लोहा, नांदेड- गंगाखेड (क्र.एम.एच. 20 एस. 8761), लातूर- परभणी (क्र. एम.एच. 20 बी.एल. 3011) अशा एकूण ६ गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी अडवून फोडण्यात आल्या. दरम्यान, आज दुपारी १२.३० वाजल्यापासून परभणीसह इतर आगारातून सोडण्यात येणाऱ्या सर्व बसेस थांबवण्यात आल्या.