होमपेज › Marathwada › मराठा आरक्षण : परभणी येथील टाकळी कुंभकर्णमध्ये हवेत गोळीबार

मराठा आरक्षण : परभणी येथील टाकळी कुंभकर्णमध्ये हवेत गोळीबार

Published On: Jul 28 2018 1:20PM | Last Updated: Jul 28 2018 1:20PMपरभणी : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन दिवस बंद, धरणे, ठिय्या देणार्‍या आंदोलकांवर लाठीमार केल्याच्या निषेधार्थ २८ जुलै रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. वसमत मार्गावरील असोला पाटी येथे आंदोलनादरम्यान जमावाने पोलिसांवर तुफान दगडफेक केली. तसेच टाकळी कुंभकर्ण येथेही पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत १ अधिकारी व दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी एसआरपीएफच्या जमावानी ५ राऊंड हवेत फायर केले.

परभणीत गुरूवारी मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पोलिसांसोबत आंदोलकांची बाचाबाची होवून तुफान दगडफेक करण्यात आली. त्यामुळे जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला होता. यावेळी जमावाकडून झालेल्या दगडफेकीत काही पोलिस कर्मचारी आणि ५५ आंदोलक युवक गंभीर जखमी झाले. त्या घटनेच्या निषेधार्थ २८ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली. त्यानूसार परभणीतील वसमत रोड, पाथरी रोडवर सकाळी ९ वाजल्यापासून चक्काजाम आंदोलनाला सुरूवात झाली. पुर्णा शहरात सकाळपासूनच सर्व शाळा, महाविद्यालये तसेच बाजारपेठ बंद ठेवण्यात आले. गौर, माटेगाव आदी ठिकाणीही चक्काजाम करण्यात आला. मानवत शहरातही बंद पाळण्यात आला. धानोरा काळे येथे गोदावरी नदी वरील डिग्रस बंधार्‍याजवळ आंदोलन करण्यात आले. जिंतूर-औरंगाबाद महामार्गावर चारठाणा येथे रास्तारोको करण्यात आला. ताडकळस, पिंगळी रस्त्यावर मोठमोठी झाडे तोडून रस्त्यावर आडवी टाकण्यात आली. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ते बंद झाले होते. नांदापूर पाटी येथे पुलावर रास्तारोको करून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.