Wed, Jan 16, 2019 11:54होमपेज › Marathwada › वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी 'छावा'ची पंढपूर आंदोलनातून माघार

वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी 'छावा'ची पंढपूर आंदोलनातून माघार

Published On: Jul 22 2018 7:13PM | Last Updated: Jul 22 2018 7:13PMप्रतिनिधी : लातूर

पंढरपुरातील आषाढी यात्रेत काही समाजविघातक शक्ती गोंधळ करण्याची शक्यता असल्याने आषाढी एकादशी दिनी तेथे  होणाऱ्या आंदोलनातून वारकऱ्यांच्या स्वरक्षणार्थ माघार घेतल्याची माहिती अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी पुढारीशी बोलताना दिली. तथापि पंढरपूर वगळता राज्यभर हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जावळे म्हणाले छावाने मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाची शासकीय पूजा न करु देण्याचा निर्धार केला होता. त्यांना याबाबत आवाहनही केले होते. त्या पार्श्वभूमीवर शासन-प्रशासन हादरले होते. आम्ही आंदोलन सुरक्षीत पार पाडण्याचे ठरवले असले तरी  या आंदोलनाशी काडीमात्र संबध नसलेले समाजकंटक छावाच्या खांद्यावर बंदुक ठेवून अप्रिय घटना घडवणार असल्याची गुप्त माहिती आम्हाला मिळाली होती. त्यात छावाचा सहभाग नसला तरी त्या गोंधळाचे खापर छावावर फोडण्याचा  मानसही या छुप्या शक्तींनी बाळगला होता.

पाडुंरगाच्या भेटीसाठी शेकडो मैल चालत येणाऱ्या निष्पाप वारकऱ्यांच्या व भाविकांच्या जिवाला यामुळे धोका निर्माण झाला होता. तो टाळण्यासाठीच आम्ही पंढरपूरपुरती आंदोलनातून माघार घेतली आहे. तथापि आरक्षणाची लढाई सुरुच राहणार असून ती आम्ही अधिक तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले.