Thu, Jul 18, 2019 08:51होमपेज › Marathwada › परळीतील मराठा ठोक मोर्चाचे रुपांतर ठिय्‍या आंदोलनात; पेच कायम

परळीतील मराठा ठोक मोर्चाचे रुपांतर ठिय्‍या आंदोलनात; पेच कायम

Published On: Jul 18 2018 6:25PM | Last Updated: Jul 18 2018 8:51PMपरळी वैजनाथ : प्रतिनिधी. ..

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सकाळी निघालेला मोर्चा अद्यापही विसर्जित झालेला नाही. तब्बल नऊ तास उलटूनही आंदोलनकर्त्यांनी तहसील परिसर सोडलेला नाही. मोर्चेकरी परळीच्या तहसील समोरून मोर्चा हलवायला तयार नाहीत. मुख्यमंत्री कार्यालयातून  ठोस निर्णायक  लेखी  आश्वासन मिळेपर्यंत परळीतील मराठा आंदोलन विसर्जित होणार नाही, या भूमिकेवर आंदोलनकर्ते ठाम आहेत. त्यामुळे दुपारपासून सुरू झालेला पेच अद्यापही ( रात्री ८ वा. पर्यंत) कायम आहे. 

जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत मराठा बांधव जागेवरून हलणार नाही, अशी घोषणा परळीतील मोर्चेकऱ्यांनी केली आणि अद्यापही सर्वजण या मुद्यावर ठाम आहेत. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. प्रत्यक्ष मुख्यमंत्री किंवा त्यांच्या कार्यालयाकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत कोणताही मोर्चेकरीआपली जागा सोडणार नाही अशी भूमिका घेतली असल्याने आता मोठा पेच निर्माण झाला आहे. 

दरम्यान प्रशासनाच्या वतीने दुपारीच मागण्यांचे निवेदन स्विकारुन वरिष्ठांना पाठवण्यात आले आहे. अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, तहसीलदार शरद झाडके, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस उपअधीक्षक भोसले  आदी अधिकाऱ्यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन वरिष्ठांकडे आपल्या मागण्या व भावना कळवल्याचे सांगितले. परंतु तरीही समाधान न होता आंदोलन  विसर्जित न करण्याची भूमिका कायमच ठेवण्यात आली. त्यामुळे  सकाळी निघालेला मोर्चा ठिय्या आंदोलनात  रुपांतरीत झाल्याचे दिसून येते. दरम्यान रात्री ८ वा.पर्यंत ही हे चित्र असून पेच अद्यापही कायम आहे.