होमपेज › Marathwada › आता मूक नव्हे, ठोक मोर्चे निघणार : आबासाहेब पाटील

मराठा क्रांती मोर्चा : पर्व दुसरे; २९ जूनला तुळजापुरातून एल्‍गार

Published On: Jun 26 2018 5:04PM | Last Updated: Jun 26 2018 5:04PMतुळजापूर : प्रतिनिधी

लाखोंच्या संख्येने ५८ मराठी क्रांती ( मूक) मोर्चे अत्यंत शांततेत, शिस्तीत, संयमाने काढून सर्व जगापुढे शांततापूर्ण आंदोलनाचा वस्तुपाठ मराठा समाजाने घालून दिला. मराठ्यांप्रमाणे इतर राज्यातही गुजर, पटेल, जाट समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी तीव्र आंदोलने केली. मात्र त्या आंदोलनात जाळपोळ, हिंसाचार, सार्वजनिक आणि सरकारी मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांना प्राण गमवावे लागले. परंतु छत्रपती शिवरायांच्या शिकवणीचा आदर्श समोर ठेवून सकल मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने प्रचंड मोर्चे काढूनही कसल्याही प्रकारचे खाजगी, सार्वजनिक किंवा सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले नाही. जातीय, धार्मिक तणाव वाढून कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. याचे सर्व श्रेय छत्रपतींचा आदर्श घेऊन निघालेल्या मराठा समाजबांधवांना आहे. 

जगभरात या शांतीपूर्ण न्याय्य मागणीच्या आंदोलनाची दखल घेतली गेली. मात्र सरकारने समाजाच्या न्याय्य मागण्यांची योग्य दखल घेतली नाही. केवळ उपसमितीचा फार्स करून विविध फसव्या घोषणा करून समाजाची दिशाभूल केली. मराठा आरक्षण, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रलंबीत आहेत. त्यामुळे आरक्षणासह इतर न्याय्य हक्क आणि मागण्यांसाठी दि. २९ जून रोजी सकाळी ११.३० वा. तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिर महाद्वारासमोर आई तुळजाभवानीचा जागरण गोंधळ घालून आंदोलनाच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरासह परराज्यातील मराठा समाजबांधव तुळजापूर नगरीत पुन्हा नव्याने रणशिंग फुंकून एल्गार पुकारणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्‍वयक आबासाहेब पाटील यांनी दिली. 

निद्रिस्त राज्य सरकारला जाग आणण्यासाठी या जागरण गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या पूर्वतयारीसाठी तुळजापूर शहर, तालुका, आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पार्किंग व्यवस्था, प्रथमोपचार, ध्वनी व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था पाणीपुरवठा व्यवस्था यासह विविध सात समित्यांचे गठन केले आहे, अशी माहितीही आबासाहेब पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथील पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, यासाठी राज्यभरासह परराज्यातील सकल मराठा समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने तुळजापुरात उपस्थित राहावे, शहरात सार्वजनिक स्वच्छतेसह शिस्त, संयम, शांततेत कसलेही गालबोट न लागता हा कार्यक्रम पार पाडावा. जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानंतर प्रातिनिधिक स्वरुपात ३ ते ४ वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. सरकारबरोबर यापुढे कसलीही चर्चा केली जाणार नाही. किंवा निवेदने दिली जाणार नाहीत. शासनाने स्वतः होऊन आपले म्हणणे सादर करावे. 

तसेच कोपर्डी अत्याचार प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले आहे. इथेही सरकारने सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी उज्‍ज्‍वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी करून आठ महिने उलटून गेले तरीही अद्याप नियुक्ती केली नाही. ती त्वरीत करून जलदगती न्यायालयात सदर प्रकरण तातडीने चालवून पीडितांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली.

जागरण गोंधळ ही दुसऱ्या पर्वाची सुरुवात आहे. यापुढे गनिमी कावा पद्धतीने आंदोलने करून सरकारला जेरीस आणण्यात येईल. मूक मोर्चे नव्हे तर ठोक मोर्चे काढून शासनाला सळो की पळो करून सोडण्यात येईल. आरपारच्या या लढ्यात यापुढील आंदोलने अधिक तीव्र केली जाणार असून त्यामुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची राहील असा इशारा आबासाहेब पाटील यांनी दिला.

या पत्रकार परिषदेत सुनील नागणे यांनी  दि. २९ रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देत सबंध जिल्हाभरातील स्वयंसेवकांचे गट विविध समितीच्या नियोजनासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.
या पत्रकार परिषदेस राज्य समन्वयक आबासाहेब पाटील, महेश डोंगरे, कोपर्डी येथील पीडित मुलीचे वडील यांच्यासह सुनील नागणे, जीवनराजे इंगळे, आबासाहेब कापसे, जगदीश पाटील, अर्जुन साळुंके, गजानन वडणे, किशोर पवार आदींसह तुळजापूर मराठा मोर्चा नियोजन समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.