Tue, Jun 25, 2019 22:08होमपेज › Marathwada › तरुणांचा ठिकठिकाणी रास्ता रोको

तरुणांचा ठिकठिकाणी रास्ता रोको

Published On: Jul 29 2018 1:23AM | Last Updated: Jul 29 2018 1:18AMबीड : पुढारी वृत्तसेवा

गेल्या अकरा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी जिल्हाभरात आंदोलन करण्यात येत आहे. शनिवारीही वांजरा फाटा, सुलतानपूर व कोळपिंप्री येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, दरम्यान दुपारी काँग्रेस नेत्या रजनीताई पाटील यांनी परळीत आंदोलकांची भेट घेतली. मराठा आरक्षणाचा विषय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना कळविणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षण मोर्चाची भूमिका परळीतूनच ठरणार असल्याचे आंदोलनाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी सांगितले.

परळीत आंदोलनाला महिलांचा पाठिंबा

 मराठा समाजाला आरक्षण द्यावे व मेगा भरती रद्द करावी, या प्रमुख मागण्या घेऊन गेल्या अकरा दिवसांपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे परळीत आंदोलन सुरू आहे. शासनाने या आंदोलनाबाबत आपली भूमिका जाहीर करत असताना परळीलाच शिष्टमंडळ पाठवून चर्चा करावी. तोपर्यंत उठायचे नाही हीच ठोक भूमिका अद्याप ही आहे, दरम्यान या ठिकाणी विविध ठिकाणच्या समाजबांधवांचा ओघ सुरूच आहे. या आंदोलनास महिलांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. आंदोलकांना भेट देऊन महिला आपला पाठिंबा व्यक्त करीत आहेत. यासह राज्यभरातील मराठा समाजातील कार्यकर्तेही येथे भेट देत आहेत, दरम्यान परळी बाजार समितीने मराठा आरक्षणाचा ठराव घेतला आहे. हा ठराव प्रशासनाला पाठविण्यात येणार आहे, दरम्यान मराठा आंदोलनाची भूमिका परळीतूनच ठरणार असल्याचे यावेळी आंदोलनचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी सांगितले.

आरक्षण न मिळाल्यास आत्मदहन

गेवराई : शासनाने मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथील तरुणांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. गुणवत्ता असताना देखील मराठा समाजातील मुलांना नोकर्‍यापासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी त्यांना शेती, ऊसतोड, मोलमजुरी करावी लागत आहे. त्यामुळे मराठा समाजास आरक्षण देऊन शासनाने नोकरभरती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी आत्मदहन करण्याचा इशारा पौळाचीवाडी येथील शरद जाधव, भारत साळुंके, सतीश पौळ, अशोक पौळ, धर्मराज पौळ, अनिल शेंडगे यांनी दिला आहे.

कोळपिंपरी येथे दोन तास रास्ता रोको

धारूर : मराठा आरक्षणासाठी आता गावपातळीवर  आंदोलन करण्यात येत आहे. शनिवारी सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये धारूर-अडस रस्त्यादरम्यान असलेल्या कोळपिंपरी या ठिकाणी त्या भागातील चार - पाच गावांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको आंदोलन केले. शनिवार आडसचा बाजार दिवस असल्याने या रस्त्यावरून ये जा करणार्‍या वाहनांच्या दुतर्फा रांगाच रांगा लागल्या होत्या. आंदोलनासंदर्भात पोलिस प्रशासन आणि तहसील प्रशासनास गावकर्‍यांनी निवेदन देऊन प्रशासनास या बाबीची पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळे या ठिकाणी पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार राजाभाऊ कदम यांना  शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते देण्यात आले. यावेळी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

मराठा आरक्षणासाठी सुलतानपूर येथे रास्ता रोको

माजलगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून तालुक्यातील सुलतानपूर येथील मुख्य रस्त्यावर शनिवारी दोन तास रास्ता रोको आंदोलन करून ठिय्या मांडला. यावेळी सरकारच्या निषेधार्थ 27 युवकांनी मुंडण करून आपला रोष व्यक्त केला. सुलतानपूर येथील युवकांनी शनिवारी सकाळी 11 वाजता  मुख्य रस्त्यावर रास्ता रोको करून दोन तास ठिय्या मांडला. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी घोषणाबाजी केली. दोन तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती, दरम्यान सरकारच्या निषेधार्थ गावातील 27 मराठा युवकांनी मुंडण करून आपला रोष व्यक्त केला. आंदोलन शांततेत पार पडले असून आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार एन. जी. झमलवाड यांना दिले.

बीड-नगर महामार्गावर रस्ता रोको

पाटोदा : मराठा आरक्षणाची मागणी करीत शनिवारी बीड - नगर राज्य मार्गावरील वांजरा फाटा येथे परिसरातील गावकर्‍यांनी रास्ता रोको केला. शनिवारी सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान झालेल्या रास्ता रोकोमुळे वाहतूक कोंडी झाली होती. मराठा आरक्षणाबरोबरच आगामी काळात होणारी मेगा भरती रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. एक तासाच्या आंदोलना नंतर तहसीलदार रुपा चित्रक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात कुसळंब, येवलवाडी, गवळीवाडी, गंड़ाळवाड़ी, चिखली, चिंचोली, शरदवाड़ी, सुप्पा, सावरगाव आटापुट्यातील येथील बांधव उपस्थित होते.