Thu, Apr 25, 2019 14:13होमपेज › Marathwada › धोंडा आला तरी आंबा येईना

धोंडा आला तरी आंबा येईना

Published On: May 20 2018 1:42AM | Last Updated: May 19 2018 11:59PMवडवणी : अशोक निपटे 

धोंड्याचा महिना म्हणजे पुरण पोळीचा आणि आमरसाचा महिना म्हणून या वर्षी मानला जात असला तरी पुरणपोळी सोबत स्वादिष्ट फुरके मारण्यासाठी आवश्यक असणारा गावरान आंबाच अजूनही वडवणीच्या बाजारपेठेत आलेला दिसत नाही. 

बालाघाटाच्या डोंगरदर्‍यात विखुरलेल्या वडवणी तालुक्यातील भागात गावरान आंब्याची संख्या पूर्वी भरपूर होती. चिखलबीड, कोठारबन, चिंचवण, देवळा, खडकी, रुई, पिंपळा, उपळी, मोरवड, हिवरगव्हाण या गावच्या  परिसरात महाकाय आंब्याची वृक्ष पहायला मिळत होते, मात्र मागील काही वर्षापासून या भागातील आंब्याच्या हजारो झाडांची संख्या कमी झाली. काही झाडे वृद्ध होऊन मोडली तर काही झाडे जमिनीतील पाणी पातळी घटल्याने वाळून गेली. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे आंब्याची झाडे तग धरत नाहीत. मात्र अजूनही काही गावातील शेतकर्‍यांनी आंब्याच्या झाडाची काळजी घेऊन झाडे टिकविली आहेत. मात्र या वर्षी गावरान आंब्याच्या झाडाला फळे भरपूर लागले नाहीत. त्यामुळे वडवणी बाजारपेठेत गावारान आंबा अद्याप पर्यंत विक्रीसाठी आलेला दिसत नाही.  

धोंड्याचा महिना असल्याने  पुरणपोळी सोबत आमरसाचा स्वाद घेण्यासाठी जावई मंडळीही सज्ज झाले आहेत. परप्रांतीय बेचव अन् अनैसर्गिक पद्धतीने पिकविलेले आंबे किमान जावायला तरी खाऊ न घालता गोड स्वादिष्ट गावरान आंब्याचा स्वादिष्ट  आमरस खाऊ घालायला सासरचे मंडळीही सज्ज झाले आहेत, मात्र गावरान आंब्याचे आगमन झाले नसल्याने सद्या तरी परप्रांतीय आंब्यावरच भागविण्याची वेळ वडवणी तालुक्यातील ग्राहकांवर आली आहे.  

आठ दिवसांची प्रतीक्षा
वडवणी तालुक्यातील अनेक गावच्या गावरान आंब्याला पाड लागला आहे. झाडावरून फळे उतरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकायला आठ दिवसांचा वेळ लागत असल्याने पुढील आठवड्यात गावरान आंबा बाजारात उपलब्ध होईल.

आंब्याचे भाव कडाडले
एकीकडे अगोदरच गावरान आंब्याचे उत्पादन घटलेले असतानाच या वर्षी अधिक मास आल्याने गावरान आंब्याची भाव कडाडले आहे. या वर्षी गावरान आंब्याचे भाव दीडशेपेक्षा पुढे जातील असा अंदाज कृषी तज्ज्ञाकडून व्यक्त केला जात आहे.