होमपेज › Marathwada › अखेर नरभक्षक बिबट्या ठार

अखेर नरभक्षक बिबट्या ठार

Published On: Dec 10 2017 8:06PM | Last Updated: Dec 10 2017 8:06PM

बुकमार्क करा

जळगाव : प्रतिनिधी

गेल्या पाच महिन्यांपासून चाळीसगाव तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरात धुमाकूळ घालणार्‍या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात अखेर यश आले असून, हैदराबाद येथील नबाब शाफतअली खान या शार्पशूटरने शनिवारी (दि. 9) रात्री साडेदहाच्या सुमारास बिबट्याला गोळी घालून ठार केले. यामुळे चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. गेल्या पाच महिन्यांत या बिबट्याने सात जणांचे बळी घेतले आहेत.

चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालणार्‍या या बिबट्याला दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश वनविभागाला देण्यात आले होते. मात्र, वनविभागाला बिबट्याचा थांगपत्ता लागत नव्हता. या बिबट्याला ठार करण्यासाठी हैदराबाद येथील शार्पशूटर नवाब शाफतअली खान यांच्यासह जिल्ह्यातील वनविभागाचे 150 अधिकारी व कर्मचारी तैनात केले होते. तसेच ट्रॅप कॅमेरे, ड्रोन, पिंजरे लावूनही बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. विशेष म्हणजे एका बाजूला वनविभागाकडून बिबट्याला ठार करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असतानाच बिबट्याकडून परिसरात सातत्याने हल्ला करण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यासह परराज्यातील शापशूटरना पाचारण करावे लागले होते. शनिवारी रात्री शार्पशूटर डॉ. सहाद नशबंदी, डॉ. सौदा नशबंदी, नवाब शाफतअली खान व त्यांचा मुलगा अजगरअली खान,  डी. जी. पवार चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे खुर्दकडे या बिबट्याचा शोध घेत असताना रात्री त्यांना पिंपळगाव शिवारात हा बिबट्या सावजाच्या शोधात फिरताना दिसला असता नबाब शाफतअली खान यांनी आपल्याजवळील बंदुकीच्या गोळीने बिबट्याला अचूक टिपत ठार केले. त्यानंतर बिबट्या ठारकेल्याची वार्ता कळताच वनविभागाच्या कर्मचार्‍यांसह नागरिकांनी जल्लोष केला.

नागरिकांनी सोडला सुटकेचा श्‍वास

बिबट्याला ठार मारल्यानंतर त्याला गाडीत टाकून घटनास्थळावरून हलविण्यात आले. मात्र, त्यानंतर त्याचे शवविच्छेदन कोठे करण्यात येणार आहे, याबाबत वनविभागाकडून गुप्तता पाळण्यात आली होती. याबाबत विचारणा करण्यासाठी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता वनविभागाच्या अधिकार्‍यांचे भ्रमणध्वनी बंद होते. घटनेनंतर चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे.