Thu, Jun 20, 2019 20:41होमपेज › Marathwada › भाग्यश्री योजनेचे भाग्य उजळेना

भाग्यश्री योजनेचे भाग्य उजळेना

Published On: May 27 2018 1:19AM | Last Updated: May 26 2018 10:18PMबीड : दिनेश गुळवे

बेटी बचाव, बेटी पढाव या योजनेस बळ देण्यासाठी व समाजातील मुलींबाबत असलेली भावना अधिक उजळविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजनेला 2014 पासून अडथळे आले आहे. 2014 ची सुकन्या व आताची भाग्यश्री योजनेसाठी आता दोन महिन्यांपूर्वी पैसे आले आहे, मात्र तेही अद्याप पात्र लाभार्थींच्या नावे न केल्याने या चांगल्या योजनेची परवड होत आहे. 

समाजात मुलींबाबत असलेला दृष्टीकोण बदलला जावा, स्त्रीभ्रृणहत्या रोखल्या जाव्यात, मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढावे, मुलींनाही मुलांसमान वागणूक मिळावी यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली आहे. 

शासनाच्या वतीने एक जानेवारी 2014 साली सुकन्या योजना सुरू करण्यात आली होती. याच योजनेची पुढे एक ऑगस्ट 2017 रोजी भाग्यश्री योजना असे नामकरण करण्यात आली. या योजने अंतर्गत ज्या दांपत्यांना एक मुलगी आहे व त्यांनी संतती नियमनाचे ऑपरेशन केले आहे, त्यांना 50 हजार रुपये एफडीच्या स्वरुपात देण्यात येतात. ज्या दांपत्त्यांना दोन मुली आहेत व त्यांनी संतत नियमनाचे ऑपरेशन केले आहे, अशा दांपत्यांच्या दोन्ही मुलींच्या नावे 25-25 हजारांची एफडी केली जाते. 

सुकन्या योजनेसाठी 2014 पासून जिल्हाभरातून अर्ज आले. यातील 11 दांपत्त्याचे प्रस्ताव मान्य करण्यात आले. यानंतरच्या माझी कन्या भाग्यश्री या योजनेत आतापर्यंत 36 दांपत्त्यांचे प्रस्ताव मान्य झाले आहेत. 

या सर्व प्रकरणांसाठी यावर्षी मार्चमध्ये निधी आलेला आहेत, मात्र हा निधी अद्यापही लाल फितीत अडकलेला असल्याने पुढील कारवाईसाठी अडकलेला आहे. समाजासाठी अनेक अंगाने महत्त्वाच्या असलेल्या अशा योजनांचा लाभही पात्र लाभार्थ्यांना वेळेवर दिला जात नसल्याने योजनेच्या उद्देशालाच खिळ बसली जात आहे. त्यामुळे हा निधी एफडी करण्याची मागणी सर्व पात्र लाभार्थ्यांकडून केली जात आहे. 

किचकट अटी

माझी कन्या भाग्यश्री ही योजना समाजातील मुलींचा दर्जा समान राखला जावा, मुली मुलांपेक्षा कमी नसून त्या समान आहेत, मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला जावा यासाठी महत्त्वाची आहे. असे असले तरी या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी अतिशय किचकट अटी आहेत. एक वा दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणे बंधनकारक आहे, यासह इतर अटींही जाचक आहेत. या योजनेसाठी पात्र ठरण्यास कागदपत्रांचीही अडचण उद्भवत आहे. या अटी शिथील करण्याची मागणी होत आहे.