Wed, Mar 27, 2019 01:59होमपेज › Marathwada › शेतकर्‍याच्या अस्थीची विटंबना

शेतकर्‍याच्या अस्थीची विटंबना

Published On: Mar 12 2018 1:17AM | Last Updated: Mar 12 2018 1:17AMमाजलगाव : प्रतिनिधी

दोन दिवसांपूर्वी पात्रूड येथील विलास काळे या शेतकर्‍याने कर्जास कंटाळून आत्महत्या केली होती. पात्रूड येथे अंत्यविधी केलेल्या ठिकाणी अस्थी सावडण्यासाठी गेलेल्या नातेवाइकांना त्या जागेवर मुरूमचा ढिग दिसला. अस्थीचे विसर्जन कसे करावे, आसा प्रश्न पडल्याने नातेवाईक संतप्त झाले.  अखेर गावकर्‍यांनी जेसीबी मशीनने अलगद मुरूम बाजूला करून अस्थी मोकळ्या केल्यानंतर पुढील विधी नातेवाइकांना करता आला.

पात्रूड येथील विलास काळे (वय 32) या शेतकर्‍याने कर्जास कंटाळून  शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर पात्रूड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी 11 मार्चला आस्थी विसर्जन करण्याचा कार्यक्रम होता. नातेवाईक स्मशानभूमीत गेले असता अंत्यविधी केलेल्या जागेवर मुरूमचा ढिग त्यांना दिसला. संतप्त झालेल्या नातेवाइकांनी माहिती घेतली असता सध्या पंढरपूर-खामगाव वारी मार्गाचे काम सुरू आहे. हे काम पाहणार्‍या कंत्राटदार कंपनीच्या कर्मचार्‍यांनी रस्त्यावरील अतिरिक्त मुरूम या स्मशानभूमीत टाकल्याचे समोर आले. यात मृत शेतकर्‍यावर अंत्यसंस्कार केलेल्या जागेवर मुरूम टाकण्यात आला.  नातेवाइकांना अस्थीविसर्जन कसे करावे हा प्रश्न पडला. याची माहिती मिळाल्यावर ग्रामस्थ जमा झाले. परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी जेसीबी मशीनने अंत्यविधी केलेल्या जागेवरील मुरूम अलगत बाजूला सारून विलास काळे यांच्या अस्थी मोकळ्या केल्यानंतर आस्थीविसर्जन करण्यासाठी रक्षा सावडण्याचा मार्ग मोकळा झाला. थोड्यावेळानंतर नायब तहसीलदार रामदासी, मंडल अधिकारी, तलाठी यांनी सदरील ठिकाणचा पंचनामा केला.  

दरम्यान, पात्रूड येथील स्मशानभूमीत अंत्यस्कार पत्र्याच्या शेडमध्ये न करता स्मशानभूमीतील मोकळ्या जागेत करण्यात येतात. स्मशानभूमीची काही जागा कंत्राटदाराला ग्रामपंचायतने रस्ता कामाचा मुरूम टाकण्यासाठी दिली होती. तेथे मुरूम जमा केल्यावर नंतर परत रस्ता कामासाठी हा मुरूम वापरला जाणार होता. शनिवारी रात्री कंत्राटदार कंपनीच्या कर्मचार्‍यांनी स्मशानभूमीच्या जागेत मुरूम टाकला.