Mon, Jun 24, 2019 21:00होमपेज › Marathwada › परळीत वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा !

परळीत वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा !

Published On: Feb 13 2018 7:23AM | Last Updated: Feb 13 2018 7:23AMपरळी वैजनाथ : रविंद्र जोशी

महाशिवरात्रीच्या पर्वकाळात परळीत वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी सोमवारी (दि.१२) मध्यरात्री पासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. 'हर हर महादेव' चा जयघोष करीत मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन महाशिवरात्रीच्या पर्वकाळात घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक परळीत सोमवारपासूनच दाखल झाले आहेत. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तेलंगणा , कर्नाटक, गुजरात आदी राज्यातील भाविकांची संख्या ही मोठ्या संख्येने दिसून येते. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून मंदिराच्या उत्तर पायऱ्यावर लोखंडी बॅरीकेटिंग लावण्यात आल्या आहेत. भव्य मंडपही उभारण्यात आला आहे. पर्वकाळ असल्याने मंदिराला मोहक विद्युत रोशनाईही करण्यात आली आहे. महिलावर्गासाठी रागांची खास सोय करण्यात आली आहे. तसेच दर्शन पासधारकांची वेगळी रांग आहे. धर्मदर्शन व पासधारक या रांगांमध्ये मध्यरात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. मंदिर परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मंदिर परिसरात १०० सी.सी.टीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी आहे.