Sun, Jul 21, 2019 10:01होमपेज › Marathwada › हर...हर...महादेवच्या जयघोषाने दुमदुमली मंदिरे

हर...हर...महादेवच्या जयघोषाने दुमदुमली मंदिरे

Published On: Feb 14 2018 2:53AM | Last Updated: Feb 14 2018 2:42AMबीड : प्रतिनिधी

महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी शहरातील शिवालयामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली. कंकालेश्‍वर, कपिलधार, चाकरवाडी, सौताडा, सोमेश्‍वर आदी ठिकाणी दर्शनासाठी भाविकांंच्या मंगळवारी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या.  भाविकांनी केलेल्या ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने मंदिरे गजबजून गेली होती.

मागील काही दिवसांपासून शहरातील कनकालेश्‍वर मंदिर ट्रस्टच्या वतीने महाशिवारात्रीचे आयोजन सुरू होते. 

शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कनकालेश्‍वर येथे महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहटेपासूनच गर्दी केली होती, तसेच बीड शहरालगत असलेल्या सोमेश्‍वर मंदिर, पापणेश्‍वर मंदिर, बालाजी मंदिर, शिवदरा आदी ठिकाणी तर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नारायणगड, श्रीक्षेत्र चाकरवाडी, कपिलधार, सौताडा आदी धार्मिकस्थळी ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे रेलचेल होती. धार्मिक विधीनंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.  

भाविकांना फराळाचे वाटप 
महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यासह राज्यभरातून येणार्‍या भाविकांसाठी शिवालयांमध्ये ट्रस्टबरोबरच अनेक सामाजिक संस्थाकडून फराळाचे वाटप करण्यात आले. दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी फराळाचा लाभ घेतला. 

आकर्षक विद्युत रोषणाई 
कंकालेश्‍वर, सोमेश्‍वर मंदिर पापणेश्‍वर, बालाजी मंदिर, शिवदरा यासह विविध ठिकाणच्या मंदिर परिसरात महाशिवरात्री निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. याबरोबरच मंडप, इतर डेकोरेशन भाविकांना आकर्षित करत होते. 

 परिसरातील मंदिरात देखील भाविकांंनी गर्दी केली होती. दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. यात महिलांची मोठी संख्या होती.