भाजपचे पैलवान रेवड्यावरची कुस्ती खेळणारे : शरद पवार

Last Updated: Oct 18 2019 6:28PM
Responsive image

Responsive image

अंबाजोगाई :  प्रतिनिधी 

सध्या सत्ता परिवर्तन ही महाराष्ट्राची गरज आहे. भाजपाच्या काळात सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हायला हवी. दरम्यान आम्ही रेवड्या कुस्त्या खेळत नाही. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाचा अध्यक्ष आहे. कोणाची कुस्ती कोणाबरोबर लावायची हे मला चांगले कळते. भाजपचे पैलवान रेवड्यावरची कुस्ती खेळणारे आहेत. कुवत नसलेल्यांसोबत कुस्ती खेळत नसतो. अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंबाजोगाई येथील प्रचार सभेत केले. 

केज मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज साठे आणि परळी मतदारसंघाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यासाठी अंबाजोगाई येथे शुक्रवारी प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पवार यांनी निवडणूकीला सामोरे जाता येईना म्हणुन भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करून विरोधकांवर खोटे गुन्हे नोंदवत आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न गेल्या पाच वर्षात सोडवता आले नाही. 370 कलम वरून दिशाभुल करून भाजप राज्यातील समस्यांवर पांघरून घालत आहे. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ३७० हेच दिले जात आहे. 

महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास असणारे महाराजांचे गडकिल्ले सांभाळता येत नाहीत. त्यामुळे हे सरकार इतिहास पुसून टाकु पाहते ते कदापही महाराष्ट्र सहन करणार नाही. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील आणि शंकरराव चव्हाण यांच्यासारखे प्रभावी मुख्यमंत्री लाभले या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व समाज घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले.

कोणाचेही भाषण शरद पवाराचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. सद्या ते झोपेतही माझे नाव घेतात. पाच वर्षापूर्वी शहा हे नाव जनतेला माहिती नव्हते. भाजपाला सत्तेतून बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ३७० ला आमचा विरोध नाही. समस्या लपविण्यासाठीच ३७० पुढे करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. असे शरद पवार यावेळी म्हणाले. 

यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी मंत्री पंडितराव दौंड, नगराध्यक्षा सौ.रचनाताई मोदी, नगराध्यक्ष अदित्य पाटील, डॉ.नरेंद्र काळे, बाबुराव मुंडे, विलासराव सोनवणे, दत्तात्रय पाटील, प्रा.मिलींद अवाड, कॉ.बब्रुवाहन पोटभरे, कुलदिप करपे, सुनिल जगताप, तुळशीराम पवार, भाई मोहन गुंड,गोविंद देशमुख, राजेश्‍वर चव्हाण,संजय दौंड, कमलताई निबांळकर, नंदकुमार मोराळे, ज्ञानोबा कांबळे, हाफिस सिद्धीखी बंन्सअण्णा जोगदंड, रवि देशमुख, वसंत उदार, अ‍ॅड.अनंतराव जगतकर, हनुमंतराव मोरे, राहुल सोनवणे, औंदुबर मोरे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

● मुंदडांचा उल्लेख टाळला 

सभेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपत गेलेले नंदकिशोर मुंदडा यांचा उल्लेख शरद पवार भाषणात करतील. ऐनवेळी तिकिट नाकारल्याबाबत काही बोलतील असे उपस्थितांना वाटले. परंतु, शरद पवार यांनी मुंदडांचा कुठल्याही प्रकारचा आपल्या भाषणात उल्लेख केला नाही. 

● शिवसंग्रामचे तुळशीराम पवार समर्थकांसह राष्ट्रवादीत दाखल

परळी-केज विधानसभा मतदारसंघात शिवसंग्रामचे संघटक तुळशीराम पवार यांनी असंख्य समर्थकांसह व पदाधिकार्‍यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला. सर्व सहकार्यांचे ना.धनंजय मुंडे यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आर.पी.आय. इंदिसे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसला जाहिर पाठींबा दिला. उपस्थित जनतेमधून अनेकांनी पृथ्वीराज साठे यांना निवडणूक लढविण्यासाठी सढळ हस्ते मदत केली.