Sun, Sep 23, 2018 02:09



होमपेज › Marathwada › चिमणी -कावळ्याची झुंज; दोन झोपड्या खाक

चिमणी -कावळ्याची झुंज; दोन झोपड्या खाक

Published On: Apr 27 2018 12:45AM | Last Updated: Apr 26 2018 10:52PM



अंबासाखर : प्रतिनिधी  

अंबाजोगाई तालुक्यातील हातोला येथील झोपडपट्टीला लागलेल्या आगीत दोन झोपड्या जाळून खाक झाल्या तर तीन घरांचे अतोनात नुकसान झाले. विजेच्या तारांवरील चिमणी-कावळ्याच्या झुंजीमुळे स्पार्किंग झाल्याने ठिणग्या उडून झोपड्यांनी पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही घटना गुरुवारी (दि.26)दुपारी घडली. हातोला गावाने वॉटरकप स्पर्धेत भाग घेतलेला आहे. गुरुवारी सकाळचे श्रमदान आटोपून लोक गावात आलेले होते. महिला घरांकडे गेल्या होत्या, तर पुरुष लोक गावातील मंदिरासमोर थांबले होते. त्याचवेळी दुपारी 12 वाजेच्या सुमारास झोपड्यांना आग लागली. वाळलेल्या कुडांमुळे आणि कडक उन्हामुळे क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले.

आग लागल्याचे लक्षात येताच झोपड्यातील आणि आजूबाजूच्या घरातील ग्रामस्थ बाहेर पळाल्याने जीवितहानी झाली नाही. श्रमदान करून आल्यामुळे सरपंच जयसिंग चव्हाण आणि बहुतांशी ग्रामस्थ गावातच होते. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत माती आणि पाण्याच्या साह्याने आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अखेर अर्ध्या तासानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत सुंदर नागोराव पंडित आणि महादेव पिराजी दासूद या दोघांच्या झोपड्या पूर्णपणे जाळून भस्मसात झाल्या होत्या तर प्रभावती लिंबराज माने, विठ्ठल इराप्पा लोखंडे, छायाबाई विलास गायकवाड यांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आग लागल्याचे पाहताच झोपड्या शेजारच्या घरातील ग्रामस्थांनी भीतीने गॅस सिलिंडर घराबाहेर आणून टाकले. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी जरी टळली असली तरी पाच कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे दोन कुटुंबे तर अक्षरशः उघड्यावर आली आहेत.

तारा घासल्याने आग

सदरील आग चिमणी-कावळ्याच्या झुंजीमुळे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. झोपड्याजवळून गेलेल्या विजेच्या मुख्य तारांवर चिमणी आणि कावळ्याची झुंज सुरू होती. त्यामुळे हेलकावे खावून तारा एकमेकांना घासल्याने स्पार्किंग झाली आणि ठिणग्या उडून खाली वाळलेल्या गवतावर पडल्या. आधीच उन्हामुळे तापलेल्या गवताने ठिणग्यामुळे लागलीच पेट घेतला आणि आग पसरून झोपड्यापर्यंत आली. तारांच्या स्पार्किंगमुळे दुर्घटनेस कारणीभूत ठरलेला कावळा देखील ठार झाला.

Tags : Marathwada, loss, because,  fire