Mon, Apr 22, 2019 02:15होमपेज › Marathwada › कर्जमाफी अर्जासाठी तारीख पे तारीख 

कर्जमाफी अर्जासाठी तारीख पे तारीख 

Published On: May 05 2018 12:50AM | Last Updated: May 04 2018 11:49PMपरभणी :प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत यापूर्वीच्या कालावधीत कर्जमाफीसाठी ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांसाठी ऑनलाइन अर्जाकरिता आता शासनाने 20 मे रोजीची वाढीव मुदत दिली. यात शासनाकडून केवळ वाढीव मुदतीची तारीख पे तारीख देण्यात असली तरी योजनेचा खरा लाभ कधी मिळणार? असा सवाल शेतकर्‍यांमधून विचारला जात आहे. 

राज्यात 2014-15 मध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. राज्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचल्याने त्यांचे दीड लाखापर्यंतचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअंतर्गत 28 जून 2017 रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यात 24 जुलै ते 22 सप्टेंबर 2017 या कालावधीत शेतकर्‍यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. मात्र अनेक शेतकर्‍यांना तांत्रिक कारणामुळे विहित मुदतीत शासनाकडे ऑनलाइन अर्ज सादर करता आले नाहीत. ही परिस्थिती विचारात घेता योजनेत अर्ज दाखल करण्यासाठी आणखी एक संधी शासनाने शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिली आहे. परभणी जिल्ह्यात एकूण 3 लाख 47 हजार शेतकरी आहेत. यापैकी जिल्ह्यातील जवळपास 3 लाख शेतकर्‍यांनी ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. उर्वरितमध्ये काही जणांनी ऑफलाइन अर्ज भरले आहेत. शासनाकडून या अर्जासाठी वेळोवेळी मुदतवाढ दिली गेली.

31मार्च नंतर14 एप्रिलची मुदत दिली होती. यात वाढीवमध्ये 1 मेची परत दिली होती. पण याही कालावधीत अनेक शेतकरी अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्याची बाब उघड झाल्यानंतर शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी परत अर्ज ऑनलाइन दाखल करण्यासाठी आता 20 मे रोजीची डेडलाइन पुन्हा दिली असल्याची माहिती राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अवर सचिव तथा सहनिबंधक रमेश शिंगोटे यांनी राज्यपालांच्या आदेशावरून शासन निर्णयाद्वारे दिली आहे.