Tue, Jun 02, 2020 19:31होमपेज › Marathwada › शेतकर्‍यांना पुन्हा 50 कोटींची कर्जमाफी

शेतकर्‍यांना पुन्हा 50 कोटींची कर्जमाफी

Published On: Feb 25 2018 1:14AM | Last Updated: Feb 25 2018 12:06AMबीड : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत डीसीसी बँकेतील शेतकर्‍यांसाठी कर्जमाफीची पाच व सहा क्रमांकाची यादी शासनाने दिली आहे. या अंतर्गत शेतकर्‍यांना 50 कोटींची कर्जमाफी मिळणार आहे. या अगोदरही शेतकर्‍यांना 570 कोटींची कर्जमाफी देण्यात आली आहे.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासह कर्जाने अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी दिली जात आहे.  बीड जिल्ह्यातील दोन लाखांवर शेतकर्‍यांनी अर्ज केले होते. या अगोदर चार ग्रीन लिस्ट तयार करून शासनाच्या वतीने 570 कोटी रुपयांची मदत देण्यात आली होती. 

या चार याद्यानंतरही अनेक शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते. आता पुन्हा दोन याद्या जाहीर केल्याने या शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. या दोन याद्यांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 43 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली आहे. त्यानुसार 21 व 23 फेबु्रवारी रोजी कर्जमाफीचा निधी देण्यात आला आहे. या अगोदरही डीसीसी बँकेला चार याद्या देण्यात आल्या असून त्यामध्ये 96 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. आता जाहीर करण्यात आलेल्या याद्यांचा लाभ बँकेचे थकबाकीदार, एकरकमी परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना होणार आहे. यासह काही रक्कम शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर निधी म्हणूनही दिला जाणार आहे. कर्जमाफीचा लाभ डीसीसी बँकेच्या 40 हजारांवर शेतकर्‍यांना झाला आहे. 

शेतकर्‍यांना मिळणार मोबाइलवर मॅसेज
ज्या शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. त्या शेतकर्‍यांना बँकांच्या वतीने व्हाईस (आवाजी) मेसेज मोबाइलवर पाठविण्यात येणार आहे. यामुळे शेतकर्‍यांना प्रत्यक्षात आपणास किती कर्जमाफी मिळाली, याची माहिती होणार आहे. 

शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली
छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. या योजनेमध्ये जे पात्र शेतकरी आहेत, त्यांना कोणत्याही अडचणीमुळे वंचित ठेवण्यात येणार नाही. पात्र शेतकर्‍यांना निश्‍चित लाभ मिळेल, याची दक्षता घेतली जात आहे. 
- शिवाजीराव बडे, जिल्हा उपनिबंधक, बीड.

लोकप्रतिनिधींना देणार याद्या
कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्‍यांची गावनिहाय यादी करण्यात येणार आहे. या याद्या तयार झाल्यानंतर त्या ऑनलाइन पाहता येणार आहेत. याशिवाय या याद्या आमदार, खासदार अशा लोकप्रतिनिधींना देण्यात येणार आहेत. त्यामुळे किती शेतकर्‍यांना कर्जमाफी झाली, याची माहिती लोकप्रतिनिधींना शेतकर्‍यांना देता येणार आहे. 

कर्जमाफी अर्ज 2 ते 12 मार्च पर्यंत पुन्हा भरता येणार
छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत काही शेतकर्‍यांना विविध कारणांनी अर्ज करता आलेले नाहीत. असे शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यामुळे आता अशा शेतकर्‍यांना पुन्हा 2 मार्च ते 12 मार्च या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.