Sat, Apr 20, 2019 08:21होमपेज › Marathwada › बेकरी उद्योगातून भागतो वीस घरांचा उदरनिर्वाह

बेकरी उद्योगातून भागतो वीस घरांचा उदरनिर्वाह

Published On: Mar 16 2018 10:38PM | Last Updated: Mar 16 2018 10:38PMनर्सी नामदेव : प्रतिनिधी

अगदी कमी भांडवल आणि योग्य नियोजनामुळे छोट्या व्यवसाय उभा करून त्याद्वारे  प्रगती साध्य केल्याचे उदाहरण हिंगोली तालुक्यातील   नर्सी नामदेव येथील नुरानी बेकरीच्या रूपाने समोर आले आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून 20 घरांतील महिलांना चांगली मजुरी मिळू लागल्याने बेकरी हा त्यांचा उदरनिर्वाहाचा एक अविभाज्य घटक बनला आहे.

महिलांनी मनावर घेतल्यावर काहीही करून दाखविण्याची त्यांची हिंमत असल्याची प्रचिती नर्सी नामदेव येथील शाहेदा स.सईद या महिलेकडे पाहिल्यावर येते. ही महिला तीन वर्षांपासून बेकरी उद्योगाकडे लक्ष  देत आहे. कुठल्याही बँकेचे कर्ज न घेता केवळ 20 हजार रुपयांचे भांडवल गुंतवणुकीतून तसेच शेजारी राहणार्‍या महिलांना एकत्रित करून शाहेदा यांनी रोजगारनिर्मिती केली आहे. सुरुवातीस केवळ नर्सीपुरताच त्यांनी हा उद्योग मर्यादित ठेवला होता. मात्र आता या उद्योगाने चांगली गती घेतली आहे. बेकरीचा माल रिसोड, सेनगाव, हिंगोली, औंढासह जवळपास 60 खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचविला जात आहे.

बेकरी उद्योगातून नर्सीतील जवळपास 20 महिलांना तर ग्रामीण भागातील अनेक दुकानदारांना चांगला रोजगार मिळत असल्याचे चित्र आहे. बेकरीत काम करणार्‍या महिलांना दिवसाकाठी शंभर ते दीडशेपर्यंत मजुरी दिल्या जाते. या मिळालेल्या मजुरीवरच महिला आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. बेकरी उद्योगात बिस्किट, समोसा, खारी, तोस, डबलरोटी   आदी विविध प्रकार तयार केले जातात. त्यात आता सर्वत्र वडा पावचा  व्यवसाय चांगलाच जोर धरत असल्याने यासाठी लागणारे पाव देखील या बेकरीतून तयार केले जातात. यातूनही बेकरीला चांगले उत्पन्‍न मिळत आहे. याकरिता लागणारा रवा, मैदा हे परभणीहून दर आठवड्याला आणले जाते. महिन्याकाठी बेकरी उद्योगातून 30 हजारांची आर्थिक उलाढाल होते. माल पोहोचविण्यासाठी बेकरीकडे सध्या एक पिकअप व्हॅनसह  लोडिंग रिक्षा आहे.

आम्हा महिलांना घराबाहेर जाऊन व्यवसाय करता येत नाही. म्हणून मी घराच्या आत बेकरीचा उद्योग सुरू केला आहे. या उद्योगातून माझ्या कुटुंबासह गावातील वीस कुटुंबांना मजुरी मिळत आहे. यातच मला खरा आनंद मिळतो.       
- शाहेदा स. सईद 
 (बेकरी व्यावसायिक )

मी हाताने अपंग असल्यामुळे मला दुसरा व्यवसाय करणे कठीण आहे; परंतु बेकरी उद्योगात तयार केलेला माल मी सकाळी गावात घरोघरी विकतो. त्यातून मला दररोज मजुरी मिळते.                                            
-शेख खाजा (विक्रेता)