Mon, Jul 15, 2019 23:59होमपेज › Marathwada › पत्नीचा खून करणार्‍या पतीस जन्मठेपेची शिक्षा

पत्नीचा खून करणार्‍या पतीस जन्मठेपेची शिक्षा

Published On: Jan 26 2018 1:18AM | Last Updated: Jan 26 2018 12:28AMहिंगोली : प्रतिनिधी

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन डोक्यात खलबत्ता घालून खून केल्याप्रकरणी पतीस हिंगोलीच्या अप्पर व सत्र न्यायालयाने पतीस दि.25 जानेवारी रोजी जन्मठेपेची शिक्षा व हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

शहरातील शाहूनगर भागात राहणार्‍या सुनीता महेंद्र गवई या आपल्या पतीसह राहत होत्या. दि.17 जुलै 2015 रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास सुनीता हिचा पती महेंद्र रामराव गवई याने त्याच्या राहत्या घरात नोकरी न करण्याच्या कारणावरून व तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन कटर व चाकूने तिचा गळा कापला. डोक्यात खलबत्ता मारून ठार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सुधाकर किसनराव वाढवे (वय 37, रा. शाहूनगर) यांच्या फिर्यादीवरून आरोपी महेंद्र रामराव गवई याच्या विरोधात हिंगोली शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासिक अंमलदार पोलिस उपनिरीक्षक विवेक सोनवणे यांनी विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे दोषारोप पत्र दाखल केले होते. हे प्रकरण अतिरिक्‍त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आय. पठाण यांच्यासमोर चालले. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सहायक सरकारी वकील एस. एम. पठाडे यांनी बाजू मांडली, तर त्यांना सहायक सरकारी वकील एन. एस. मुटकुळे यांनी सहकार्य केले. सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. दि.25 जानेवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आय. पठाण यांनी दोन्ही पक्षांचा युक्‍तिवाद ऐकून आरोपी महेंद्र गवई यास कलम 302 भादंविनुसार दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.