Thu, Jun 27, 2019 11:48होमपेज › Marathwada › बिबट्या  पुन्हा देवठाण्यात

बिबट्या  पुन्हा देवठाण्यात

Published On: Mar 24 2018 1:51AM | Last Updated: Mar 24 2018 1:04AMपरभणी : प्रतिनिधी

 गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यात भ्रमंती करून  बिट्या पुन्हा देवठाण्याच्या गंगथडीला विश्रांती घेत असल्याचे वझुर येथील मासेमाराच्या निदर्शनास आले आहे. यामुळे भीतीने भयभीत झालेल्या शेतकर्‍यांची भीती कायम असून बिबट्याला पकडण्यात अपयशी ठरलेल्या वन विभागाने पुन्हा देवठाणा परिसरात सक्रिय होऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी  होत आहे.

पूर्णा तालुक्यातील देवठाणा-देऊळगाव परिसर बिबट्याच्या भीतीने भयभीत झाला आहे. दोन शेतकर्‍यांची कोवळी गोवंशजातीचे जनावरे या बिबट्याचे भक्ष बनले. रात्री-बेरात्री  शेतकर्‍यांच्या आखाड्यावर हैदोस घालणारा बिबट्या आता देवठाण गावचा निवासी पाहुणाच झाल्याच्या नवचर्चेला उधाण आले आहे.  5 मार्च रोजी रात्री देवठाणा येथील शेतकरी पिराजी जोगदंड यांच्या आखाड्यावरील वासराचा फडशा पाडणार्‍या बिबट्याने आज इथे तर उद्या तिथे दर्शन देत 19 दिवसांपासून वन विभागाच्या हातावर तुरी देत आहे. पालम तालुक्यातील अंजनवाडी व गंगाखेड तालुक्यातील गावांमध्येही जनावरांवर हल्ले करीत बिबट्याने दहशत निर्माण केली. बिबट्या पालम तालुक्यात असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकार्‍यांनी  दिली होती. यानंतर मात्र गोदापट्यातील शेतकर्‍यांनी सुटकेचा निश्‍वास टाकला अन् भीती दूर झाली, मात्र दोन दिवसांपूर्वी बिबट्याचे पुन्हा कमबॅक झाल्याने देवठाण्यात चर्चेला उधाण आले. वझूर येथील मासेमारी करणारे कोळी गोदावरी नदीत मासे पकडताना त्यांना बिबट्या पाण्यातून येत असताना दिसला. तेव्हा त्यांनी त्या  पळ काढला अन् गाव जवळ केले.
 

 

Tags : parbhani, parbhani news, leopard found, gangakhed, palm