Fri, Jul 19, 2019 07:04होमपेज › Marathwada › नेत्यांचे वारसदार राजकारणात सक्रिय

नेत्यांचे वारसदार राजकारणात सक्रिय

Published On: Jul 05 2018 1:39AM | Last Updated: Jul 04 2018 10:52PMपाटोदाः महेश बेदरे  

सध्या सर्वच क्षेत्रात युवकांचे युग असून त्याला  राजकारण ही अपवाद नाही. राजकारणातही आता अनेक युवा नेत्यांची फौज सक्रिय झाली आहे. विशेष म्हणजे या युवा नेत्यांकडे उच्चशिक्षणाचीही जोड असून हे युवक आता आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर मतदार संघाच्या राजकारणात दमदार पाऊल टाकत आहेत.

भारतीय परंपरेनुसार कुठल्याही क्षेत्रातील दिग्गज हे आपले वारसदार योग्य वेळी ठरवत असतात त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रात तर घराणेशाही चालतेच. सध्या या मतदार संघातीलही दिग्गज राजकीय नेत्यांची दुसरी पिढी देखील राजकारणात सक्रिय होताना दिसत असून बदलत्या राजकीय घडामोडीत हे उच्चशिक्षित युवा नेते आपला जम बसविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

या सर्वांमध्ये सध्या माजी राज्यमंत्री सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस हे अत्यंत सक्रिय झाले आहेत. उच्चशिक्षीत असलेल्या जयदत्त धस यांनी पुणे येथील नामांकीत कॉलेजमधून बी. कॉम. ची पदवी घेतली आहे, मागील काही वर्षांपासून त्यांनी आपल्या वडिलांसोबत सतत राहून राजकारणातील बारकावे आत्मसात केले आहेत. आ. धस यांच्याप्रमाणेच कार्यशैली असलेल्या जयदत्त धस यांनी संपूर्ण मतदारसंघातील युवकांचे मोठे संघटन उभा केले आहे. त्याच प्रमाणे बदलत्या घडामोडीत धस-दरेकर सोयरीक ही झाल्यामुळे आता आपोआपच त्यांच्या पाठीशी मोठी ताकद उभा राहिली आहे. त्यामुळे भविष्यात या मतदार संघाच्या नेतृत्त्वासाठीही त्यांचे नाव समर्थकांकडून चर्चिले जात आहे.

तसेच विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांचे चिरंजीव अजय धोंडे हे ही सध्या मतदारसंघातील तरुणांच्या संपर्कात आहेत. एल. एल. एम. ची पदवी शिक्षण सुरू असलेले अजय धोंडे हे विकास कार्यक्रमांच्या निमित्ताने संपर्क वाढवत आहेत.  मतदार संघातील आणखी एक मातब्बर नेते माजी आमदार साहेबराव दरेकर यांचे नातू सागर दरेकर हे ही युवकांमध्ये आपला संपर्क वाढवत असून विज्ञान शाखेची पदवी घेतलेल्या सागर दरेकरांनाही धस-दरेकर सोयरीकीचा भविष्यतील राजकीय वाटचालीत फायदा होण्याची शक्यता आहे.