होमपेज › Marathwada › पित्याचा कुर्‍हाडीचे घाव घालून खून

पित्याचा कुर्‍हाडीचे घाव घालून खून

Published On: Dec 19 2017 2:01AM | Last Updated: Dec 18 2017 9:35PM

बुकमार्क करा

लातूर : प्रतिनिधी

शेतात जेवत असलेल्या बापावर कुर्‍हाडीचे घाव घालून मुलाने त्यांचा खून केला. शेतीच्या वाटणीवरून उदगीर तालुक्यातील चांदेगाव शिवारात रविवारी दुपारी हा थरारक प्रकार घडला. 

केरबा गणपती वंगवाड (60) असे मृत पित्याचे नाव आहे. रविवारी केरबा आपल्या परिवारासह वेळ अमावास्या साजरी करण्यासाठी शेतावर गेले होते. ते जेवणासाठी बसले असताना पाठीमागून त्यांचा थोरला मुलगा गोविंद हातात कुर्‍हाड घेऊन आला व त्याने बेसावध असलेल्या वडिलांच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घातले. दरम्यान, त्याची आई सुंदराबाई यांनी त्यास रोखण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांच्यावर त्याने वार केल्याने त्याही जखमी झाल्या. नंतरही गोविंदने केरबा यांच्यावर अमानुषपणे वार केले. त्यात ते गतप्राण झाले.  

नंतर त्याने  त्यांचा मृतदेह उचलला व वेळअमावास्याच्या पूजेकरिता उभारलेला खोपीत नेऊन टाकला. त्यावर तुराट्या टाकून खोपच पेटवून दिली. यामुळे मृतदेहाची राख झाली. त्यानंतर गोविंदने एका शेतकर्‍याच्या शेतावर जेवण घेतले व तो पसार झाला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जळालेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी दवाखान्यात पाठविला असून पोलिसांचे पथक फरार गोविंदच्या शोधात रवाना झाले आहे.