होमपेज › Marathwada › लातुरात आंदोलकांनी बॅरिकेट मोडले

लातुरात आंदोलकांनी बॅरिकेट मोडले

Published On: Aug 01 2018 12:33PM | Last Updated: Aug 01 2018 1:16PMलातूर : प्रतिनिधी

लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील यांच्या लातूर येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्यास जाणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांना पोलिसांनी रोखले. पोलिसांनी रोखल्याने संतप्त आंदोलकांनी बॅरिकेट मोडून थेट पाटील यांच्या निवस्थासमोर ठिय्या मांडला. यावेळी आंदोलकांनी पालकमंत्रच्या नावाने बोंब ठोकली. एक मराठा लाख मराठा या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

राज्यभर लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आज ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. याची सुरुवात  लातूरमध्ये झाली आहे. सकाळी ११ वाजता आंदोलक एलआयसी कॉलनीत असलेल्या पाटील यांच्या निवस्थानाकडे निघाले होते. तथापि पालकमंत्र्यांच्या घराजवळच पोलिसांनी अडथळे लावले होते. हे अडथळे पाहून आंदोलक आक्रमक झाले. पालकमंत्री कुठे आहेत त्यांना मराठा समाजाचे प्रश्नशी काही देणे-घेणे आहे का? मराठा तरुण मरत आहेत परंतु पालकमंत्री मस्त फिरत आहेत, असा आरोप आंदोलकांनी केला.  

संभाजीराव पाटील हे मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य असून त्यांनी कधी मराठा आरक्षणावर गंभीरपणे चर्चा केली नाही. हा विषय निकालात निघावा म्हणून खंबीर भूमिका घेतली नाही. अशा राजकाण्यांना समाजाचे मातेरे केले आहे. हे चित्र पुसण्यासाठी  आरक्षणाच हाच पर्याय असून ते मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असेही आंदोलकांनी ठणकावले.

पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

पालकमंत्री संभाजीराव पाटील हे खरोखरच मराठा समाजाचे असतील आणि त्यांना मराठा समाजाची कणव असेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दयावा अशी मागणी केली. 

आंदोलकांचा आमदारांना सज्जड दम

आमदारांच्या घरासमोर आजचे आंदोलन सनदशीर मार्गाने सुरू आहे. परंतु आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी न लागल्यास आमदार -खासदारांची गय केली जाणार नाही असा सज्जड दम आंदोलकांनी भरला.