Thu, Apr 25, 2019 11:42होमपेज › Marathwada › लातूर जिल्ह्यात मराठा आंदोलनाची धग कायम

लातूर जिल्ह्यात मराठा आंदोलनाची धग कायम

Published On: Jul 21 2018 3:51PM | Last Updated: Jul 21 2018 3:51PMप्रतिनिधी : लातूर

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची धग जिल्ह्यात विस्तारत असून शनिवारी औसा –उमरगा रोडवर रास्ता रोको करण्यात आला व रेणापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा समाजाच्या प्रश्नांवर मौन बाळगणाऱ्या खासदार आमदारांना मृत समजून आंदोलकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. 

औसा शहरापासून जवळ असलेल्या व औसा टी पाईंट नावाने ओळखल्या जाणाऱ्या लातूर- उमरगा  मार्गावर सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या दरम्यान रास्ता रोको करण्यात आला.  आंदोलनामुळे त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहनाच्या रांगाच रांगा दिसून येत होत्या. आंदोलनकर्त्यांनी रसत्यावर बैठक दिली होती. सरकार विरोधी घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ला‌वण्यात आला होता.

सनदशीर मार्गाने लाखोच्या संख्येत मोर्चे काढुनही मराठा समाजाच्या मागण्या शासनदरबारी मार्गी लागल्या नाहीत. त्या मान्य व्हाव्यात म्हणून मराठा साजाच्या लोकप्रतिनिधींनी सभागृहात आवाज उठवला नाही. समाजासाठी ते मेले आहेत असे समजून आरक्षणाची लढाई कोणत्याही नेतृत्वाविना समाजानेच हाती घेतली आहे व त्‍या मागण्या मान्य झाल्यानंतरच ही लढाई संपणार असल्याची संतप्त प्रतिक्रीया यावेळी आंदोलकांनी यावेळी दिली. त्यांनी रसत्यावरच मराठा समाजाच्या आमदार-खासदारांना श्रध्दांजली वाहिली.

परळी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा म्हणून रेणापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी साडेदहा वाजता मराठा सामजबांधवानी तहसलीवर मोर्चा काढुन बंदसाठी नागरीकांना आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद केली.  समाजाच्या वतीने  तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.  यावेळी सरकार विरोधात मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.