Thu, Jun 20, 2019 14:42होमपेज › Marathwada › लातूरच्या पालकमंत्र्यांची खुर्ची लिलावात

लातूरच्या पालकमंत्र्यांची खुर्ची लिलावात

Published On: Dec 21 2017 8:15PM | Last Updated: Dec 21 2017 8:15PM

बुकमार्क करा

प्रतिनिधी : लातूर 

लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव शिवसेना व शेतकरी संघटनेच्या पुढाकारातून निलंगा येथे गुरुवारी करण्यात आला. ५ हजारापासून सुरू झालेली बोली ४५ हजारांवर गेली. यात अधिक बोली लावलेल्‍या अखिल भारतीय छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी ही खुर्ची घेतली. यावेळी शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील उपस्थित होते. 

शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, वीज पुरवठा, वीजबीलमाफी आदी कामे करण्याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष नाही. या शेतकरी विरोधी धोरणाने शेती व शेतकरी संकटात सापडला आहे, असा आरोप करीत याच्या निषेधार्थ हा लिलाव ठेवला होता. त्यासाठी निलंगा विधानसभा मतदारसंघ साळुंके व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापूरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पिंजून काढला होता. पालकमंत्री संभाजीराव पाटलांचे काका तथा काँग्रेसचे  सरचिटणीस  अशोकराव पाटील निलंगेकर, शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्यासह अनेकांनी बोलीसाठी शुल्क भरले होते. तथापि ऐनवेळी त्यांनी पाठ फिरवली. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते सत्तार पटेल मात्र आवर्जुन उपस्थित राहीले. 

निलंग्याच्या शिवाजी चौकात एक पालकमंत्र्यांची खुर्ची अशी कागदी पट्टी चिकटवलेली मोठी खुर्ची ठेवण्यात आली होती. सकाळी ११ वाजता बोलिस  ५ हजाराने सुरुवात झाली. पुढे हा आकडा वाढत ४५ हजारापर्यंत पोहचला. अखरेच्या  बोलीस अखिल भारतीय छावा मराठी संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी होकार भरला व खुर्ची त्यांच्या मालकीची झाली. 
लिलाव शुल्कापोटी संकलीत झालेले सुमारे सव्वा दोन लाख रुपये गरजू शेतकऱ्यास अथवा एखाद्या समाजीक कामासाठी देण्यात येणार आहेत. खुर्ची विकून आलेली रक्कम अंबुलगा साखर कारखान्यावर झालेल्या आंदोलनात शहीद झालेले शेतकरी दाजीबा लांबोटे यांच्या वारसास व मुख्यमंत्र्यांचे  हेलीकॉप्टर कोसळून बेघर झालेल्या व सरकारी मदत न मिळालेल्या निलंगा येथील लक्ष्मण कांबळे यांना विभागून दिली जाणार आहे. रकमेतील एक हजार रुपये  शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री साह्यता निधीस देण्यात येणार आहेत.