Tue, Jul 23, 2019 16:51होमपेज › Marathwada › लातुरात 'क्लास वॉर' मधून हत्याकांड; प्राध्यापक मास्टरमाइंड

लातुरात 'क्लास वॉर' मधून हत्याकांड; प्राध्यापक मास्टरमाइंड

Published On: Jun 26 2018 7:02PM | Last Updated: Jun 26 2018 8:39PMलातूर : प्रतिनिधी

लातूर जिल्ह्याला हादरवून सोडणार्‍या अविनाश चव्हाण हत्येचा छडा लातूर पोलिसांनी अवघ्या 36 तासांत लावला आहे. या प्रकरणी पाच जणांना गजाआड करण्यात आले. क्‍लासच्या जीवघेण्या स्पर्धेतून हत्याकांड घडल्‍याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा मास्टरमाइंड कुमार मॅथ्स या कोचिंग क्‍लासेसचे संचालक चंदनकुमार छोटेलाल शर्मा ( वय 29) हा असून त्याने अविनाश यांच्या हत्येची सुपारी दिली होती असे तपासात उघड झाले आहे.

अक्षय भिवा शेंडगे (वय 29), शरद सूर्यकांत घुमे (वय 29), करण चंद्रपालसिंह गहिरवार (26), महेशचंद्र प्रभाकरराव घोगडे (30) अशी अन्य आरोपींची नावे आहेत. वीस लाखांची सुपारी शर्मा याने दिली होती. चव्हाण यास संपविण्यासाठी बिहारमधून पिस्तूल आणले होते. संशयितांकडून पिस्तूल, 13 जिवंत काडतुसे, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व रोख 2 लाख 35 हजार रुपये आरोपींकडून जप्त केल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी सांगितले.

काही वर्षांपूर्वी बिहार येथील  प्रा. चंदनकुमार शर्मा हा नोकरीनिमित्त लातुरात आला होता. काही काळ त्याने येथील एका नामांकित महाविद्यालयात 11 वी 12 वीचा गणित विषय शिकवला. शिकवणीचे फॅड रुजलेल्या या शहरात स्वतः क्लासेस काढले तर मोठी कमाई होईल या उद्देशाने त्याने 2009 मध्ये कुमार मॅथ्स या नावाने उद्योग भवन परिसरात शिकवणी वर्ग सुरू केला. त्यांची व अविनाश चव्हाण यांची काही काळ या व्यवसायात भागीदारी होती. पुढे अविनाशने स्टेप बाय स्टेप या नावाने स्वतंत्र क्लास सुरू केला. जमही बसवला. त्यामुळे चंदनकुमारच्या क्लासची विद्यार्थी संख्या घटली. येथेच चंदनकुमार दुखावला गेला. दरम्यान, अविनाश हा आपला खून करणार असल्याची माहिती प्रा. चंदनकुमार यास मिळाली होती. त्यावेळीच त्याने आपणास मारणार्‍यालाच मारायचे अशी योजना आखली होती. हे काम फत्ते करण्यासाठी तो मारेकर्‍यांच्या शोधात होता. ही बाब त्याने लातुरातील फायनान्स चालक महेश घोगडे (रेड्डी) यास सांगितली व त्याने शरद घुमे याच्याशी संपर्क करून प्लान सांगितला. शरदने याची जबाबदारी त्याचा परिचित करण चंद्रपालसिंग गहेरवार याच्यावर टाकली. या संदर्भात 4 जून रोजी घुमे याच्या घरी बैठकही झाली. 20 लाखांवर सुपारी ठरली. यावेळी साडेआठ लाख रुपये आरोपींना देण्यात आले. रविवारी रात्री अविनाशला संपवायचे ठरले. दरम्यान, लातूर येथील एलआयसी कॉलनीत राहणारा अक्षय शेंडगे यास एकास मारावयास जायचे आहे म्हणून करणने सोबत घेतले. त्याच्या दुचाकीवर बसून ते दोघे अविनाश यांच्या घरानजीक असलेल्या शिवाजी शाळेजवळ गेले. तेथे अविनाशवर करणने गोळ्या झाडल्या. प्रत्यक्ष खून करण्यापूर्वी मारेकर्‍यांनी अविनाश यांच्या घरासमोरील परिसरात रेकी केली होती. त्यानंतर रविवारी रात्री त्यांच्यावर हल्ला केल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. काम फत्ते झाले म्हणून करण व अक्षय हे त्यांच्या दोन मित्रांसह तिरुपतीला दर्शनासाठी गाडीने जात होते, परंतु पोलिसांनी त्यांना अर्ध्यातूनच ताब्यात घेतले. अवघ्या 36 तासांत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाला यश आले. त्यांच्यावर मोठ्या विश्‍वासाने पोलिस अधीक्षकांनी टाकलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. बावकर यांच्यासह त्यांचे सहकारी कर्मचारी रामहरी भोसले, खुर्रम काझी, यशपाल कांबळे, प्रकाश भोसले, युवराज गिरी, रवी गोंदकर आदींचे कौतुक करून त्यांना याकामी पोलिस अधीक्षक डॉ. राठोड यांनी बक्षीस दिले. दरम्यान, मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास लातूर येथील खाडगाव स्मशानभूमीत अविनाश चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशी झाली पोलखोल

या प्रकरणाचा प्रचंड ताण पोलिसांवर होता. तथापी, त्यांच्या नजरा प्रत्येकाचे स्कॅनिंग करीत होत्या. या वेळी त्यांच्या खबर्‍याने एलसीबीचे सपोनि. सुधाकर बावकर यांना गुप्त माहिती दिली होती व पोलिस निरीक्षक बालाजी नागरगोजे यांनी आरोपीच्या शोधाची जबाबदारी बावकर यांच्याकडे सोपवली होती. बावकर यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने रविवारी रात्रीच चार आरोपींना लातुरातून उचलले. पोलिसी हिसक्यापुढे ते सुतासारखे सरळ झाले. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी सकाळी प्रा. चंदनकुमार यांना पोलिस अधीक्षकांसमोर हजर केले. प्रारंभी तो ‘मी नाही त्यातला’ असे वर्तन करू लागला. पोलिसी खाक्‍या दाखवताच, त्याने सारे काही कबूल केले.

बिहारमधून आणले पिस्तूल

हत्येसाठी पिस्तूल हवे होते. यासाठी आरोपींनी परळी येथील एका इराण्याशी संपर्क केला. त्याने दीड लाखात एक पिस्टल व 15 काडतुसे देण्याचा ठराव केला. त्यानुसार परळी येथील रेल्वेस्थानकावर बिहार येथून आलेल्या एका व्यक्‍तीने त्यांना पिस्टल दिले. ते नीट चालते की नाही? हे तपासण्यासाठी अंबाजोगाई साखर कारखाना परिसरात त्याचे आरोपीने ट्रायल केल्‍याचेही समोर आले आहे..