Sat, Jul 20, 2019 23:22होमपेज › Marathwada › पोलिसाच्या जाचाला कंटाळून अॅटोचालकाची आत्महत्त्या

पोलिसाच्या जाचाला कंटाळून अॅटोचालकाची आत्महत्त्या

Published On: Mar 21 2018 6:28PM | Last Updated: Mar 21 2018 6:28PMलातूर : प्रतिनिधी

पोलिसाच्या मारहाणीत ज्येष्ठाच्या मृत्यूची घटना ताजी असताना निलंगा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तुपडी या गावी मंगळवारी त्याचीच पुनरावृत्ती झाली. पोलिस व एका सावकाराच्या जाचाला कंटाळून एका अॅटोचालकाने गळफास घेतल्‍याची घटना समोर आली आहे. शिवराज संभाजी अभंगे असे आत्‍महत्‍या केलेल्‍या व्यक्‍तीचे नाव असून मृत्यूपूर्वी त्याने लिहलेल्या चिठ्ठीतून हा प्रकार उघ़ड झाला आहे. संबधीतांवर गुन्हा नोंद केल्याशिवाय प्रेत ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.

काही दिवसांपूर्वी शिवणी कोतल परिसरात एका ट्रकला धडकल्याने तिघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले होते. तेथून शिवराज हे त्यांचा अॅटो (टमटम) घेऊन जात होते. या घटनेबाबत त्यांना काहीही माहिती नव्हती. असे असताना पानचिंचोली बिटच्या पोलिसांनी शिवराज यांच्याच अॅटोने दुचाकीस्वाराला उडवल्याचे सांगत त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. पानचिंचालीचे बिट अमलदार जीवन जाधव हे शिवराज यांच्या घरी गेले व त्यांनी त्यांना मारहाण केली. या प्रकरणातून नाव वगळायचे असेल तर पाच लाख रूपये दे असा दम भरला. त्यानंतर त्यांना मोटारसायकलवरुन नेऊन त्यांच्याजवळील पाच हजार रुपये घेतले. उर्वरीत पैसे न दिल्यास घरातील सर्वांना काळ्या पाण्याला पाठवतो अशी धमकी दिली. या साऱ्याने आपले पती तणावात गेले. आपले व आपल्या कुटूंबाचे कसे होईल? हा ताण असह्य झाल्याने त्यांनी मंगळवारी भानुदास जाधव यांच्या शेतातील झाडास गळफास घेतल्याचे शिवराज यांच्या पत्नी सुनिता यांनी निलंगा पोलिस निरीक्षकांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आपल्या पतीच्या मृत्यूस जीवन जाधव हेच जबाबदार असून, त्यांच्यावर कारवाई करावी असेही त्यांनी तक्रारीत म्हटले  आहे. दरम्यान शिवराज यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीतही पोलिस जमादार जाधव व प्रकाश कलशेट्टी यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे.

Tags : latur, auto rickshaw driver,make sucide , police, threat,