Sun, Jul 21, 2019 16:24
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › 'अन्यथा मराठा आमदारांच्या तोंडाला काळे फासणार' 

'अन्यथा मराठा आमदारांच्या तोंडाला काळे फासणार' 

Published On: Aug 04 2018 4:18PM | Last Updated: Aug 04 2018 4:18PMलातूर : प्रतिनिधी  

मराठा क्रांतीच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ठिय्या आंदोलनात मराठा समाजातील आमदार-खासदारांनी सहभागी व्हावे अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवारी झालेल्या ठिय्या आंदोलनातून देण्यात आला. शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या निवास्थासमोर हे आंदोलन झाले. यावेळी आमदार काळे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

सकाळी पावने अकराच्या सुमारास एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत व घंटानाद करीत हे आंदोलन सुरू झाले. त्तपूर्वी सुमित सावळसुरे व नववाथ माने यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. आंदोलनाची पूर्वकल्पना असतानाही आमदार काळे हजर न राहिल्याने त्यांचा आंदोलकांनी निषेध केला, स्वकीयांच्या अशा भूमिकेने समाजाचे वाटोळे झाले असून अशा वृत्तीचे राजकारणी हे समाजाचे खरे शत्रू असल्याची भावना अनेकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. युवक मरत आहेत तरीही मराठा लोकप्रतिनिधी गप्प आहेत. आरक्षण मिळवून देण्यासाठी लागणारी इच्छाशक्तीही त्यांच्याकडे नाही. हे आंदोलन त्यांचे नाही ? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला. क्रांती दिनी होणारे आंदोलन हे शासनाच्या उरात धडकी भरवणारे करण्याचा व  त्यासाठी गावा - गावात वाड्या वसत्यांत संदेश पोहचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. आमदार विक्रम काळे यांचे वडिल दिवंगत वसंतराव काळे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करुन त्यांनी शेतकरी व ग्राम विकासात दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला व आमदार विक्रम यांनी वडीलांचा हा वसा वारसा त्यांच्यात रुजवावा, असा सल्ला दिला. आरक्षणाची ही लढाई ते मिळेपर्यंत सुरुच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आंदोलन परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.