सेलू : संतोष कुलकर्णी
एकेकाळी प्रतिष्ठेचे लक्षण समजल्या जाणार्या व सुख-दुःखाची बातमी देणार्या लॅण्डलाईनची आजची अवस्था अतिशय खडतर झाली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात दिवसेंदिवस नवनवीन बदल होत असताना अनेक जुन्या गोष्टी आजही सुखकारक असल्याचे जाणवते. अगदी त्याचप्रमाणे फोन म्हणजे अर्धी भेट म्हणून अशी ओळख निर्माण झालेल्या लॅण्डलाईन दूरध्वनीची स्पर्धेच्या युगात घुसमट होताना दिसते. कारण ग्राहक आणि दूरसंचार विभागाची उदासीनता यामुळे लॅण्डलाईनचे अस्तित्व धोक्यात येताना दिसते.
पूर्वीच्या काळी निरोपासाठी अथवा दूरवरून संवादासाठी पत्रव्यवहार माध्यम होते. त्यात आत्मीयता व प्रेम ओसंडून वाहत असे. लॅण्डलाईन सेवेने माणसामाणसांतील, गावागावांतील अंतर कमी केले. कोसो दूर असलेल्या माणसाशी क्षणार्धात प्रत्यक्ष संवाद होऊ लागला. वायरलेस महणजे तरंग टेलिफोन सेवाही सुरू झाली. याहीपुढे तंत्रज्ञानाने प्रगती केली आणि मोबाइल सेवा सुरू झाली.
2000 मध्ये सुरू झालेली मोबाइल सेवा आणि त्यात होत गेलेले बदल यामुळे खिशातील संवादाचे माध्यम आणि बोलणार्या दोन व्यक्ती एकमेकांना प्रत्यक्ष पाहू लागल्या. खासगी-सरकारी यंत्रणा व ग्राहकदेखील मोबाइल दुनियेत हरवून गेले. त्यामुळे लॅण्डलाईन यंत्रणा दुर्लक्षित झाली. ग्राहक संख्येबरोबरच तिची कार्यक्षमताही कमी झाली. दोन माणसांतल्या, दोन मनांना जोडणारी लॅण्डलाईन यंत्रणा स्पर्धेचा बळी ठरली.
सेलू तालुक्यात 10 हजारांवर मोबाइलधारक
सेलू तालुक्यात सन 2000 पूर्वी लॅण्डलाईनची संख्या अडीच ते तीन हजारपर्यंत पोहोचली होती. मोबाइलचा पर्याय आल्यानंतर लॅण्डलाईनची संख्या रोडावून केवळ 580 इतकी झाली. त्याउलट मोबाइलची संख्या 10 हजारांवर पोहोचली. लॅण्डलाईन वापरणार्यांची संख्या कमी होण्याचे कारण म्हणजे पर्याय मिळाला. त्याशिवाय रस्ते व पुलांच्या दुरुस्तीमुळे लॅण्डलाईन सेवा वारंवार नादुरुस्त होत असे. त्यामुळे लोकांनी कंटाळून लॅण्डलाईन सेवा बंद केली. आज जी सेवा सुरू आहे त्यासाठी दूरसंचार विभागाकडून सेवा दिली जात नाही. त्यामुळे वारंवार खंडित होते. परत आजही तालुक्यात 4 जी सेवा सुरू नाही म्हणून तांत्रिक अडचणीला सामोरे जावे लागते. सेलू शहरासाठी 3 जी चे दोन तर 2 जी चे चार मनोरे आहेत. त्याशिवाय तालुक्यात डासाळा, कुपटा, वालूर, चिखलठाणा, हिस्सी अशा भागांत 2 जी चा प्रत्येकी एक मनोरा आहे. याशिवाय 3 जी चे 2 मनोरे मंजूर आहेत. मात्र तत्काळ गतीने सेवा देणारे 4 जी यंत्रणा तालुक्यात कार्यान्वित होण्यासाठी 6 महिने लागतील.