Sat, Jul 20, 2019 09:14होमपेज › Marathwada › कयाधू कोपली;14 गावांना फटका

कयाधू कोपली;14 गावांना फटका

Published On: Aug 22 2018 12:57AM | Last Updated: Aug 21 2018 11:58PMहिंगोली : प्रतिनिधी

रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कयाधू नदीला पुर आल्याने नदीकाठी असलेल्या अनेक गावांत पुराचे पाणी घुसले. तसेच नदी काठच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जवळपास 14 गावांना कयाधूच्या महापूराचा फटका बसला आहे. मागील दहा वर्षात पहिल्यांदाच कयाधू मोठा महापूर आला. पुराच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल प्रशासनाचे अधिकारी ठिकठिकाणी भेटी देत आहेत. 

मागील दोन दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊस सुरू असल्याने नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कयाधू नदीला पूर आला. या पुरामुळे नदीकाठच्या चौदा पेक्षा जास्त गावांना फटका बसला आहे. कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव, सालेगाव, चाफनाथ, शेवाळा, डोंगरगाव पूल, सापळी, कस्बे धावंडा, डिग्रस, चिखली, कान्हेगाव, पिंपरी, येगाव, नांदापूर, पूर, वसई, हिंगणी, समगा आदी गावांना पुराचा फटका बसला असून पुराचे पाणी शेतात घुसल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पीक पुराच्या पाण्यात भुईसपाट झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

मागील चोवीस तासात जिल्हाभरात 61.96 मिमी पावसाची नोंद झाली असून 12 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. वार्षिक सरासरीच्या 581 मिमी पावसाची नोंद महसूल प्रशासनाकडे करण्यात आली आहे. हिंगोली तालुक्यातील हिंगोली मंडळात 81 मिमी, खांबाळा 65 मिमी, माळहिवरा 78 मिमी, सिरसम 77 मिमी, बासंबा 82 मिमी, नर्सी नामदेव 48 मिमी, डिग्रस 37 मिमी, कळमनुरी 90 मिमी, नांदापूर 95 मिमी, आखाडा बाळापूर 74 मिमी, डोंगरकडा 58 मिमी, वारंगा फाटा 61 मिमी, वाकोडी 18 मिमी, सेनगाव 40 मिमी, गोरेगाव 50 मिमी, आजेगाव 55 मिमी, साखरा 12 मिमी, पानकनेरगाव 45 मिमी, हत्ता 48 मिमी, वसमत 32 मिमी, हट्टा 61 मिमी, गिरगाव 37 मिमी, कुरूंदा 60 मिमी, टेंभूर्णी 35 मिमी, आंबा 60 मिमी,हयातनगर 74 मिमी, औंढा नागनाथ 87 मिमी, जवळाबाजार 79 मिमी, येहळेगाव 93 मिमी, साळणा 77 मिमी असा एकुण सरासरी 61.96 मिमी पाऊस झाल्याने जिल्हाभरातील अनेक नदी, नाल्यांना पुर मोठ्या प्रमाणात आला होता.

शेवाळा ः कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथून वाहत जाणार्‍या कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे गावात पाणी घुसले. तसेच पुरामध्ये सहा ते सात शेतकरी जागलीसाठी गेल्याने ते शेतातच अडकले. त्यांना सुखरूप देवजना येथे हलविण्यात आले. पुराचा मोठा फटका पिकांना बसला असून, शेतात पाणी घुसल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पीके वाहून गेले आहे. पुराची माहिती मिळताच तहसीलदार प्रतिभाताई गोरे, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचेपोलिस निरीक्षक व्यंकट केंद्रे, माजी सभापती रावसाहेब सावंत, नायब तहसीलदार ऋषी, तलाठी गिरी, पंचायत समितीचे उपसभापती गोपू सावंत, सरपंच अभय सावंत पाटील, बिट जमादार मार्के, चव्हाण, प्रशांत जाधव, विलास गांजरे, बालाजी सुर्यवंशी, माजीद नाईक यांनी पुराची पाहणी करून सुचना दिल्या. तसेच पुराच्या पाण्यामुळे गावातील विठ्ठल धोंडबा सावंत व बाळू लक्ष्मण सावंत यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले.  दुपारी 4 वाजल्यानंतर कयाधूचा पूर ओसरला.

कळमनुरी ः सोमवारी रात्रीपासून झालेल्या जोरदार पावसामुळे कयाधू नदीला पुर आल्याने नदी काठच्या शेतात पाणी घुसून पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तालुक्यातील नांदापूर, सोडेगाव, कोंढूर, डिग्रस, चाफनाथ यासह इतर गावात पुराचे पाणी घुसले. तसेच शेतीचेही प्रचंड नुकसान झाले. कयाधू नदीच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क दिवसभर तुटला होता. तालुक्यातील अनेक लहान-मोठ्या नदी, नाल्यांना पुर आला. नदी, नाल्याच्या काठी असलेल्या शेतीला पुराच्या पाण्याचा फटका बसला. पुर परिस्थितीची पाहणी तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी केली.

हट्टा : हट्टा ते सावंगी या रस्त्यावरील धामोडा नाल्याला पूर आल्याने दोन दिवसांपासून वाहतूक ठप्प असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मंगळवारी पाणी कमी झाल्यामुळे सावंगी, सोन्ना, ब्राम्हणगाव, ढऊळगाव येथील ग्रामस्थ जीव धोक्यात घालून धामोडा पुलावरून ये-जा करित होते.

धामोडा नाल्यावरील पूल जमिनी लगत झाल्यामुळे थोडा पाऊस पडला तरी या नाल्याला तेव्हाच पुर येतो. परिणामी गाव परिसरातील नागरिकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागतो. सावंगी ते हट्टा रस्त्यावरील धामोडा नाल्यावरील पुलाची उंची वाढवून रस्ता दुरूस्त करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात अनेक वेळा धामोडा नाल्याला पुर येत असल्यामुळे शिक्षक अनेक वेळा शाळेकडे जावू शकत नाही. तसेच दैनंदिन व्यवहाराला अडथळा निर्माण होत असल्याने सावंगी, ब्राम्हणगाव, सोन्ना, ढऊळगाव येथील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या बाबीचा विचार करून धामोडा नाल्यावरील पुल बांधण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.

जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार परिसरासह विविध गावात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. परिणामी आजरसोंडा, नालेगाव, पोटा (खु), पुरजळ, शिरला, आदी मार्गावरील विविध नाल्यांना पावसाने पूर आल्याने मागील दोन दिवसापासून संपर्क तुटला आहे. त्यामुळे सदरील गावातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ येत आहे.
जवळाबाजारसह परिसरात 15, 16 व 17 ऑगस्ट सलग तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून खरिपाची पिके पावसा अभावी धोक्यात आली होती. पण या पावसाने खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तर विविध नाले पावसाच्या पाण्याने भरले होते. त्यातच 19 व 20 ऑगस्ट सलग दोन दिवस जवळाबाजारसह परिसरातील गावात मुसळधार पावसाने विविध नाल्यांना पूर आल्याने 30 ते 40 गावांचा संपर्क तुटला होता. यामध्ये पुरजळ, शिरला, आजरसोंडा, नालेगाव पोटा (खु), पेजाबाद आदी विविध गावांचा समावेश आहे. सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने ऊस, कापूस, सोयाबीन, तुर, ज्वारी आदी पिके वारा व पावसाने आडवी झाली आहेत. या पावसाने खरीपासह बागायत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सेनगाव : गेल्या चार ते पाच दिवसांपासून सेनगाव शहरासह तालुक्यात रिमझिम पाऊस पडत आहे. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अर्धातास मुसळधार पाऊस झाला. यात शहरातील आप्पास्वामी मंदिर समोर राहणारे व मोलमजुरी करुन आपल्या संसाराचा गाडा कसाबसा चालवणारे पुरुषोत्तम नंदनकर यांचे जुने माळवद अचानक पडल्याची घटना घडली. सुदैवाने पुरूषोत्तम व त्यांची पत्नी जागी असल्यामुळे ते त्वरीत दुसर्‍या खोलीमध्ये गेल्याने बालंबाल बचावले गेले. पहिलेच आर्थिक परिस्थिती हलाखिची असतांना त्यातच माळवद कोसळल्याने ते अधिकच आर्थिक संकटात सापडले आहेत. सेनगावचे तलाठी बि.डी.पांडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. पंचनाम्याचा अहवाल तहसीलदार यांच्याकडे पाठविला असल्याची माहिती तलाठी पांडे यांनी दिली.