होमपेज › Marathwada › जुई धरणात ‘रात्रीस खेळ चाले’

जुई धरणात ‘रात्रीस खेळ चाले’

Published On: Feb 11 2018 12:55AM | Last Updated: Feb 11 2018 12:27AMभोकरदन : प्रतिनिधी 

शहरासह 25 गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दानापूर येथील जुई धरणातून मोठ्या प्रमाणात परिसरातील काही शेतकरी रात्रीचा पाण्याचा अवैध उपसा करत आहे. यामुळे शहरावर पाणीटंचाईचे सावट दिसून येत आहे. 

 प्रशासनाकडून यापूर्वी वारंवार धाडी टाकूनही निर्ढावलेल्या पाणी चोरांकडून पाणी उपसा सुरूच आहे. त्यामुळे भोकरदन शहरावरील संभाव्य पाणीटंचाईचे संकट दूर करायचे असेल तर प्रशासनाने कठोर पावले उचलून अशा पाणी चोरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे. धरणातील पाण्याचा शेती व शहरांसह 25 गावांतील पिण्यासाठी उपयोग करण्यात येतो. यंदा सुरुवातीपासून झालेल्या जोरदार पावसामुळे जुई धरण 100 टक्के भरले. या धरणातील पाणी परिसरातील शेतकर्‍यांना सध्या पाटबंधारे विभागाकडून रब्बी हंगामासाठी सोडण्यात येत आहे. या आठवड्यात शेवटचे पाणी सोडण्यात येणार आहे. काही शेतकर्‍यांनी अधिकृत परवानगी घेतलेली आहे तर काही शेतकरी अवैध पाणी उपसा करीत आहे. पाणी उपशाचे प्रमाण, बाष्पीभवन, तसेच पाणी मुरण्याचा वेग पाहता काही दिवसांतच धरण कोरडे ठणठणीत पडण्याची शक्यता आहे. धरणातील शासकीय विहिरींमधून पिंपळगाव रेणुकाई, दानापूर, देहेड, मनापूर, तळणी यांसह इतर गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. 

अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी आतापासुन सुरू झाली आहे; पण पाणीच संपले तर मोठा बिकट प्रसंग उभा राहणार आहे. अवैध पाणी उपसा होत असल्याने प्रशासनाच्या पथकाने या ठिकाणी धडक कारवाई करून विद्युत मोटारी आणि इंजिन जप्त करण्याची गरज आहे.