Thu, Jun 20, 2019 20:40होमपेज › Marathwada › जांगडगुत्ता : PNB घोटाळा ‘सौ साल बाद’

जांगडगुत्ता : PNB घोटाळा ‘सौ साल बाद’

Published On: Feb 18 2018 9:39AM | Last Updated: Feb 19 2018 1:22AMबीड : प्रदीप भागवत

इ.स.२११८... मुंबईतील कालाघोडा भागातील एका शोरूमसमोर एक हिर्‍यांच्या घोड्याचा शानदार पुतळा उभारलेला. त्यासमोर एक मोठा पेंडॉल टाकलेला. या हिर्‍याचे पुतळ्याचे उद्घाटन करण्यासाठी जागतिक कीर्तीचे हिरे व्यापारी ‘मिरव’कुमार आलेले. देशभरातील तमाम उद्योजक, राजकारणी, बॉलिवूड-हॉलिवूडच्या नट-नट्या हिर्‍याच्या घोड्याचा पुतळा अनावरण समारंभासाठी आलेले. जवळपास 11 हजार कोटी रुपयांचा खर्च करून पीएनबीने (पुन्हा न्हाईबा बँक) हा पुतळा तयार करवून घेतला होता. थोड्याच वेळात अनावरणाचा औपचारिक कार्यक्रम सुरू झाला. हिरे व्यापारी ‘मिरव’कुमार अनावरणासाठी सज्ज झालेले. त्यांनी हातात 500 कोटींचा एक हिरा घेतला आणि तो घोड्याच्या दिशेने नेम धरून फेकला. हिरा घोड्याच्या पुतळ्याला लागताच अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने त्यावरील पडदा दूर झाला आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

‘मिरव’कुमार दोन शब्द मार्गदर्शनपर बोलायला उभे राहिले, पण हे काय त्यांच्या डोळ्यांत आसू. वातावरण एकदम गंभीर झाले.

‘मिरव’कुमार (डोळे पुसत) ः आज बरोबर शंभर वर्षे झाली त्या घटनेला. माझ्या पूर्वजांच्या हिर्‍याच्या शोरूमवर इथेच या काळ्या घोड्याजवळ तेव्हाच्या काही नतद्रष्ट अधिकार्‍यांनी छापा टाकला होता आणि माझ्या पूर्वजांना तेव्हा विदेशात पलायन करावे लागले होते. काही लोक तेव्हा म्हणायचे की, माझ्या पूर्वजांनी देशाला घोडा लावला म्हणून. ती त्यांची कूपमंडुक वृत्ती होती. असो. त्या घटनेच्या शताब्दी वर्षानिमित्त मीच ‘पुन्हा न्हाईबा बँके’च्या सौजन्याने इथे हा हिरेजडित घोडा उभारला आहे आणि या ठिकाणी तुम्ही मला अनावरणाला बोलावले, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की, त्या वेळी आमच्या पूर्वजांना खूप त्रास सहन करावा लागला. या देशातून त्या देशात जावे लागले, पण शेवटी सत्याचा विजय होतोच. मुळात काय की शंभर वर्षांपूर्वी लोकांचे प्रचंड गैरसमज होते. बँका या गोरगरिबांच्या पैसे सुरक्षित ठेवण्याची जागा आहे, त्यांना कर्ज देणारी संस्था आहे, बेरोजगार तेथून कर्ज घेऊन मोठा तीर मारतील, अशा प्रकारचे ते गैरसमज होते, पण आमच्यासारख्या लोकांच्या पूर्वजांनी ते खोटे ठरविले. अशा सर्वसामान्यांना कर्जे देणे, त्यांना पायावर उभे करणे यात जर त्या वेळच्या बँका गुंतून पडल्या असत्या तर देश कधीच एवढा झटपट पुढे केला नसता. तेव्हाचे सव्वाशे करोड देशवासीय आहे तिथेच राहिले असते. त्यामुळेच बहुतेक बँकांनी आमच्यासारख्या निवडक लोकांशी गुपचूप टायअप करून वाट्टेल तेवढा पैसा पुरविला. अहो, कोणाला सात, आठ वर्षे खबर लागायची नाही. त्यामुळे आमच्यासारखे लोक रातोरात फोर्बसच्या यादीच झळकू लागले. देशविदेशात त्यांची हवा झाली. भारताचे नाव झाले. नाही तर आधी अमेरिकेवाले भारताला भिकार्‍यांचा आणि सापांना तालावर नाचायला लावणार्‍या गारुड्यांचा देश समजायचे. आता तुम्हीच सांगा ‘पुन्हा न्हाईबा बँके’सारख्या बँका आमच्या पूर्वजांच्या पाठीशी राहिल्या नसत्या तर न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी हिर्‍यांचे आलिशान शोरूम आमच्या पूर्वजांना काढता आले असते का? आमच्या पूर्वजांचा काहीही स्वार्थ नव्हता. भारताची शान वाढावी, देशाची देशविदेशात पत वाढावी यासाठीच त्यांनी हे केले. त्या वेळच्या बँकांनी देशाच्या प्रगतीला एक प्रकारे मोठा हातभार लावला. त्यांनी एवढे सहकार्य केले की विचारू नका. म्हणजे काय की, बिचार्‍या अगदी नाईलाजच झाला म्हणून पूर्वजांवर तक्रार करायचे, पण त्याआधीच साहेब आता तक्रार करतो बरं का, असे म्हणून पूर्वसूचनाही द्यायचे. त्यामुळे व्हायचे काय की, आमच्यासारख्यांना आधीच सुखरूप देशाबाहेर जाण्याची संधी मिळायची. आमच्या पूर्वजांनी हृदयावर दगड (हिर्‍याचा) ठेवून तेव्हा कसा देश सोडला असेल, याची कल्पना करूनच माझ्या अंगावर काटे येतात. बँकांच्या अशा सहकार्‍याबद्दल खरे तर मला ऋण व्यक्‍त करायचे होते, पण मी त्यांच्या ‘ऋणा’तच राहणे पसंत करीन. कारण ‘ऋण’ फेडले तर तो कृतघ्नपणा ठरेल. (डोळे पुसत) त्या काळी अशाच प्रकारे अनेकांनी बँकांच्या आयत्या पैशांवर नागोबा होत मोठमोठे उद्योग उभारले, बेरोजगारांना रोजगार दिला (दारू विकण्याचा आणि दारू पिण्याचा), आयपीएल स्पॉन्सर्ड केल्या, लोकांचे मनोरंजन केले, देशाचे नाव केले. तेव्हा त्या लोकांनी घेतलेले कष्टच देशाच्या कामी आले आहेत. आज देशातील सर्व बँका तेव्हा देशातून बाहेर जावे लागलेल्यांच्याच मालकीच्या आहेत, हे अभिमानाने सांगावेसे वाटते. बँकेत शेवटचा सर्वसामान्य येऊन तब्बल 50 वर्षे झाली आहेत, कारण सध्या बँका फक्‍त श्रीमंतांसाठीच राखीव ठेवलेल्या आहेत. आजही देशात गोरगरीब आहेत, पण ते आता बँकांच्या भरवशावर न राहता स्वत:च पकोडे तळून श्रीमंत होत आहेत.