Fri, Jul 19, 2019 05:11होमपेज › Marathwada › रेतीची चोरटी वाहतूक करणारे पाच टिप्पर जप्‍त

रेतीची चोरटी वाहतूक करणारे पाच टिप्पर जप्‍त

Published On: May 31 2018 3:50PM | Last Updated: May 31 2018 3:50PMहिंगोली : प्रतिनिधी

हिंगोली उपविभागाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्या पथकाने गुरूवारी (दि.31) सकाळी 7.30 च्या सुमारास हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाट्यानजीक अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे पाच टिप्पर ताब्यात घेतले. यामध्ये 1 कोटी 25 लाखाचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला असून, प्रत्येकी टिप्पर मालकास 2 लाख 75 हजार असा एकुण 13 लाख 75 हजाराचा दंड लावल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मागील वर्षभरापासून एसडीएम प्रशांत खेडेकर यांनी वाळूमाफीयांचे कंबरडे मोडून चोरट्या वाळू वाहतुकीला प्रतिबंध घातला आहे.

हिंगोली उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी मागील वर्षभरात हिंगोली उपविभागातील वाळूमाफीयांना सळो की पळो करून सोडले आहे. आतापर्यंत अनेक मोठ्या कारवाया करून वाळूची चोरटी वाहतूक बंद केली होती. पुन्हा 31 मे रोजी सकाळी 7.30 च्या सुमारास रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती एसडीएम खेडेकर यांना मिळताच त्यांनी तहसीलदार गजानन शिंदे, नायब तहसीलदार बोथीकर, मंडळ अधिकारी खंदारे, अल्‍लाबक्ष, सय्यद अब्दूल, प्रदीप इंगोले, गजानन रणखांब, अशोक केंद्रेकर, हर्षवर्धन गवळी, पांडूरंग बाबर, गजानन पारसकर, भगाजी बेले यांच्या पथकाने छापा टाकून टिप्पर क्रमांक एमएच 38 एक्स 7771, एमएच 38 एक्स 7791, आरजे 06 जीबी 3718, एमएच 38 बी 9293, एमएच 22 एएन 3333 हे पाच टिप्पर जप्‍त करून शहर पोलिसांच्या हवाली केले. या कारवाईत 1 कोटी 25 लाख रूपयाचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे. तसेच प्रत्येकी 2 लाख 75 हजाराचा दंड लावण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी दिली.

जप्‍त करण्यात आलेल्या वाहनचालकांकडे वाळू वाहतूक करण्याच्या पावत्यावर मागील तारखा आहेत. अक्षरी दिनांक पावतीवर लिहिलेला नसणे तसेच सदरील वाहनातून रेती वाहतूक करतांना ती झाकलेली नसणे इत्यादी नियमांचे उल्‍लंघन करण्यात आल्याची ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पथक प्रमुखाने दिली.