Tue, Nov 13, 2018 11:09होमपेज › Marathwada › गौण खनिज चोरीच्या गुन्ह्यांत  घट

गौण खनिज चोरीच्या गुन्ह्यांत  घट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जालना : प्रतिनिधी

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी वाळूसह इतर गौण खनिज चोरीच्या तुलनेत मोठी घट झाल्याचे चित्र कागदावर दिसून येत आहे. गतवर्षी एप्रिल 2016 ते मार्च 2017 दरम्यान गौण खनिज चोरीप्रकरणी प्रशासनाने 2 कोटी 30 लाख 94 हजार 878 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. त्यापैकी 1 कोटी 42 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. चालू वर्षात 11 महिन्यांत केवळ 1 कोटी 32 लाख 78 हजारांचा दंड महसुलला प्राप्त झाला आहे. त्यामुळे कागदोपत्री जरी गौण खनिजाच्या चोरीत घट झाली असली तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळीच आहे.

जिल्ह्यात वाळूसह इतर गौण खनिजाच्या चोरीत मोठी वाढ झालेली असतानाच  दुसरीकडे प्रशासन मात्र कारवाईत कमी पडत असल्याचे दिसत आहे. वाळूचोरी विरोधातील महसूलच्या पथकावर वारंवार हल्ले होण्याच्या घटना वाढत आहेत. वाळूमाफिया हे राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते बनल्याने त्यांना राजकीय संरक्षण मिळत असल्याची चर्चा आहे.

गेल्या अकरा महिन्यात आठ तालुक्यांत 341 प्रकरणांत 1 कोटी 32 लाखांची वाळू चोरी करणार्‍यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 49 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, 29 जणांना अटक करण्यात आली आहे. 

वाळू चोरीत जालना तालुक्यात 34 प्रकरणांत 15 लाख 12 हजार, बदनापूर 33 प्रकरणांत 10 लाख 50 हजार, भोकदन 82 प्रकरणांत 30 लाख 16 हजार, जाफराबाद 42 प्रकरणांत 8 लाख 41 हजार, परतूर 17 प्रकरणांत 3 लाख 25 हजार, मंठा 19 प्रकरणांत 4 लाख 10 हजार, अंबड 86 प्रकरणांत 45 लाख 85 हजार, तर घनसावंगी तालुक्यात 28 प्रकरणांत 15 लाख 84 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 


  •