Mon, Jun 24, 2019 16:38होमपेज › Marathwada › बीड पोलिसांनी विणल्या उसवलेल्या रेशीमगाठी

बीड पोलिसांनी विणल्या उसवलेल्या रेशीमगाठी

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 12 2018 1:41AMबीड : बालाजी तोंडे 

विवाह म्हणजे पवित्र सोहळा, या मंगलमय सोहळ्यात पती-पत्नीच्या पवित्र नात्याची रेशीमगाठ गुंफल्या जाते. मात्र कधी-कधी छोट्या मोठ्या कारणावरून या रेशीमगाठी उसवतात. सुखाने सुरू झालेला संसार वितुष्ट निर्माण होऊन मोडतो. मागील दोन महिन्यांत 66 प्रकरणापैकी 24 कुटुंबाच्या उसवलेल्या रेशीमगाठी बीड पोलिसांनी पुन्हा विनल्या. मोडलेले संसार जोडण्यासाठी पोलिसांबरोबर सखी सेलने महत्वाचे योगदान दिले. भुतकाळातील एकमेकांच्या चुकांवर पांघरून घालून नव्याने संसाराची सुरुवात करणार्‍या या दाम्पत्यांना पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी टॉवेल-टोपी आणि साडी-चोळीचा आहेर केला. सामाजिक भान जपणारे पोलिस आणि सखी सेलच्या या उपक्रमाचे  सर्व स्तरातून स्वागत होत आहे.  

घरातील कुरबूर, संशय, भांडण-तंटे अशा विविध कारणांवरून पती- पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. चार भिंतीच्या आतले भांडण चव्हाट्यावर येऊन संसार मोडतो. प्रकरण पोलिसात जाते, संसार मोडलेली अशी कितीतरी प्रकरणे रोज पोलिसात येतात. हे मोडलेले संसार पुन्हा जोडले जावेत, उसवलेल्या रेशीम गाठी नव्याने विनल्या जाव्यात यासाठी नागपूर, अहमदनगर आणि बीड येथे प्रायोगिक तत्वावर सखी सेलची स्थापना करण्यात आली आहे.  

कौटुंबिक अन्याय-अत्याचार झालेल्या महिलांना एका छताखाली सर्व सुविधा आणि न्याय मिळावा हा या मागचा प्रमाणिक हेतू आहे. बीडचे पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांनी पोलिस अधिक्षक कार्यालयात सखी सेलसाठी जागा उपलब्ध करून दिली. मे महिन्यात सुरू झालेल्या सखी सेलने दोन महिन्यांत समोर आलेल्या 66 प्रकरणांपैकी 24 प्रकरणात तडजोड घडवून आणली. जे पत्नी एकमकांपासून विभक्त होण्यासाठी भांडत होते त्यांनी पोलिस आणि सखी सेलच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एकमेकांना गुलाब पुष्प दिले. विभक्त होऊ पाहणारे हे 24 दाम्पत्य पुन्हा नव्याने संसाराचा गाडा हाकणार आहेत.

उसवलेल्या रेशीमगाठी पुन्हा विनण्यासाठी पोलिस अधिक्षक जी श्रीधर, स्थानिक गुन्हा शाखेचे घनशाम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक माने, अनिल पुराणिक, महिला पोलिस मतकर, लकडे, दीपाली सावंत, कल्पना चव्हाण, करमाटे, गोरे यांनी तर सखी सेल पॅनलमधिल सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले, अशोक तांगडे, तत्वशिल कांबळे, ज्योती गायकवाड, दीपाली गायकवाड, नाना गव्हाणे, शेख तय्यब, संतोष गायकवाड, गोविंद साठे, दत्ता नलावडे तसेच पोलिसांच्या वतीने विधिज्ञ म्हणून तेजस नेहरकर यांनी योगदान दिले. या सर्वांचा  प्रमाण पत्र देऊन गौरव केला.