Tue, Jul 07, 2020 09:20होमपेज › Marathwada › बसच्या धडकेत पती-पत्नी ठार

बसच्या धडकेत पती-पत्नी ठार

Published On: Jul 22 2019 2:02AM | Last Updated: Jul 22 2019 2:02AM
बदनापूर, प्रतिनिधी : जालना-औरंगाबाद महामार्गावर दुचाकीवरील दाम्पत्याला भरधाव लक्झरी बसने चिरडले. यात दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. बदनापूरजवळील कृषी संशोधन केंद्राच्या प्रवेशद्वासमोर रविवारी (दि. 21) सकाळी हा अपघात झाला. या अपघातानंतर घटनास्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

शेकटा (ता. औरंगाबाद) येथील हमीद खान नूर खान पठाण व ताहेराबी हमीद खान पठाण हे दाम्पत्य दुचाकीवरून (एमएच 20, एफडी 6834) अंबड येथे रविवारी सकाळी जात होते. साडेअकराच्या सुमारास कृषी संशोधन केंद्राच्या प्रवेशद्वासमोरील रस्त्याने  जालन्याकडे भरधाव जाणार्‍या लक्झरी बसने (क्रमांक जीजे 01 सीव्ही 6666) हमीद खान पठाण यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीवरील    दोघांच्याही अंगावर चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह रस्त्यावरून हलवले. शेकटा येथील दाम्पत्य चिरडले गेल्याची बातमी समजताच शेकटा येथूनही नागरिक दाखल झाले. त्यानंतर संतप्‍त नागरिकांनी उभ्या असलेल्या लक्झरी बसची तोडफोड केली. तसेच आग लावण्याचा प्रयत्नही केला. पोलिसांनी नागरिकांना समजावून ही बस बदनापूर पोलिस ठाण्याच्या आवारात आणून उभी केली. काहींनी रस्त्यावरून ये- जा करणारी वाहने थांबवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस शेख इब्राहिम, अनिल चव्हाण, उडगिरकर, अनारसे, जाधव व इतर नागरिकांनी  जमावाला शांत केल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली.