Sun, May 26, 2019 13:23होमपेज › Marathwada › उल्‍लेखनीय कामगिरी करणार्‍या अधिकार्‍यास वरिष्ठांची आडकाठी

उल्‍लेखनीय कामगिरी करणार्‍या अधिकार्‍यास वरिष्ठांची आडकाठी

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 20 2018 12:26AMहिंगोली ः प्रतिनिधी

कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्याकडे मागील दहा महिन्यांपासून हिंगोलीच्या एसडीएमचा अतिरिक्‍त पदभार देण्यात आला होता. त्यांनी दहा महिन्यांच्या कार्यकाळात उल्‍लेखनीय कामगिरी करून रेतीमाफियांना सळो की पळो करून सोडले होते; परंतु त्यांची ही उल्‍लेखनीय कामगिरी काही राजकीय नेतेमंडळींना खटकणारी राहिल्याने अखेर त्यांचा पदभार काढण्याचे आदेश थेट मंत्रालयातून उपसचिवाच्या स्वाक्षरीने शनिवारी देण्यात आले.

 मात्र या निर्णयाविरोधात सामान्य जनतेमधून नाराजी व्यक्‍त होताना दिसत आहे. हा प्रकार म्हणजे चांंगल्या अधिकार्‍यांचे मनोधैर्य खच्चीकरण करणारे ठरत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या जागी पांडुरंग बोरगावकर यांना पदभार देण्यात आला असून त्यांच्या कामगिरीकडे हिंगोलीकरांचे लक्ष लागले आहे.

दहा महिन्यांपूर्वी कळमनुरी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी म्हणून प्रशांत खेडेकर रूजू झाले होते. त्यांना हिंगोली उपविभागाचा पदभार देण्यात आल्यानंतर त्यांनी शेतीच्या वादाबाबत दाखल प्रकरणाचा निपटारा करून सामान्य शेतकर्‍यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. तसेच अभिलेखे कक्ष संगणकीकृत करणे, सातबारा ऑनलाइन करणे यासह महसुली वसुलीचे लक्षही कमी वेळात पूर्ण केले. त्यांच्या काळात रामलिला मैदानाच्या फुटकळ व्यापार्‍यांच्या प्रश्‍नांवरही वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यात आला. विशेष म्हणजे दहा महिन्यांच्या कार्यकाळात अवैध रेती वाहतूक करणार्‍याविरोधात कारवाईचा धडाका लावून जरब बसविली होती; परंतु काही निर्णय पुढार्‍यांना खटकणारे ठरल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून होती. पुढारी विरोधात महसूल अधिकारी असा सुप्‍त संघर्ष काही काळापासून सुरू होता. खेडेकर यांना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांचे कायम पाठबळ राहिले; परंतु शनिवारी अचानक मंत्रालयातून उपसचिवाच्या स्वाक्षरीने खेडेकरांचा हिंगोलीचा अतिरिक्‍त पदभार काढण्याचे आदेश धडकल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले. 

जात आहे.एसडीएमचा पदभार देण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना असताना थेट मंत्रालयातून पदभार काढून पांडुरंग बोरगावकर यांच्याकडे देण्याचे आदेश धडकल्याने या मागे राजकीय पाठबळाची शंका उपस्थित केली जात आहे. हिंगोली जिल्ह्यात नेहमीच चांगले अधिकारी येत नसल्याची ओरड होत असताना चांगले काम करणार्‍या अधिकार्‍यांना मात्र वेठीस धरण्याचा प्रकार या आदेशावरून समोर आल्याने सामान्य जनतेमधून तीव्र नापसंती व्यक्‍त केली जात आहे. 

बोरगावकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्‍ती असताना त्यांच्याकडेही हिंगोलीचा पदभार देऊन वरिष्ठांनी काय साधले, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दहा महिन्यांच्या कार्यकाळात हिंगोली उपविभागाच्या कामकाजात आमूलाग्र बदल करून प्रशासन लोकाभिमुख करण्याबरोबरच प्रशासनाला गती देण्याचे काम करणार्‍या खेडेकरांना चांगल्या कामाचे बक्षीस म्हणून त्यांचा पदभार काढल्याची शक्यता व्यक्‍त केली जात असल्याने भविष्यात पुन्हा जिल्ह्यात चांगला अधिकारी येण्यास धजावणार नाहीत, अशी चर्चाही सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.