Thu, Apr 25, 2019 15:30होमपेज › Marathwada › बाजोरियांच्या उमेदवारीने घोडेबाजाराचे संकेत

बाजोरियांच्या उमेदवारीने घोडेबाजाराचे संकेत

Published On: Apr 30 2018 1:44AM | Last Updated: Apr 29 2018 11:46PMहिंगोली : गजानन लोंढे

हिंगोली-परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अकोल्याचे आमदार श्रीकिशन बाजोरिया यांचे चिरंजीव विप्लव बाजोरिया यांना शिवसेनेच्या वतीने उमेदवारी निश्‍चित करण्यात आली असून, रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा एबी फॉर्म दिला आहे. उद्योगपती असलेल्या विप्लव बाजोरियांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत घोडे बाजाराचे संकेत दिसत असल्याने मतदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपला युतीबाबत न विचारता शिवसेनेेने उमेदवार मैदानात उतरविण्याची तयारी केल्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भाजपतील इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी  फेरल्याचे चित्र समोर आले आहे.

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुराणी आमदार आहेत. त्यांचा कार्यकाळ संपत आल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ असल्याने बाबाजानी दुराणी यांची उमेदवारी निश्‍चित असल्याची चर्चा असली तरी दुसरीकडे, काँग्रेसही हा मतदारसंघ लातूर-उस्मानाबाद, बीड मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडून परभणी मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याने अद्याप आघाडीबाबत अनिश्‍चित वातावरण आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्यापही चर्चेचे गुर्‍हाळ सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने भाजपवर मात करीत थेट विप्लव बाजोरियांच्या रूपाने उमेदवार जाहीर करण्याची तयारी केल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. मागील महिनभरापासून माजी आमदार स्व. कुंडलीकराव नागरे यांचे चिरंजीव सुरेश नागरे यांनी दोन्ही जिल्ह्यांत चाचपणी सुरू केली होती. परंतु मतदारसंघात भाजपचे संख्याबळ शिवसेनेपेक्षा कमी असल्यामुळे शिवसेनेने भाजपच्या वाट्याला असलेली ही जागा स्वतंत्र उमेदवार देऊन लढविण्याची तयारी केल्याने भाजपच्या पदाधिकार्‍यांची अडचण झाली आहे. पक्षश्रेष्ष्ठी बरोबरच इच्छुकांचीही घालमेल वाढली आहे. रविवारी मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट विप्लव बाजोरिया यांना पक्षाच्या वतीने एबी फॉम देऊन निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, खासदार बंडू जाधव,आमदार जयप्रकाश मुंदडा, शिवसेनेेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, आमदार राहुल पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी झालेल्या चर्चेत बाजोरिया यांच्या पाठीमागे दोन्ही जिल्ह्यांतील शिवसेनेचेे बळ उभे करण्यासंदर्भात रंगनिती आखण्यात आली.  शिवसेनेच्या मतदारांनाही अच्छे दिन येण्याचे संकेत मिळत आहेत. वजनदार उमेदवार मिळाल्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांचा उत्साह वाढला आहे. निवडणुकीत समोर आलेली नावेही दिग्गजांची असल्याने घोडे बाजार चांगलाच  फोफावणार असल्याचे दिसून येत आहे.