Sun, Mar 24, 2019 04:09होमपेज › Marathwada › बाजार समित्यांमध्ये लाचखोरीची कीड

बाजार समित्यांमध्ये लाचखोरीची कीड

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 23 2018 12:27AMहिंगोली : प्रतिनिधी

पारदर्शकतेचा आव आणून बाजार समित्यांमध्ये व्यवहार करणार्‍या जिल्ह्यातील भाजपचे दोघे सभापती दीड महिन्यात एसीबीच्या गळाला लागल्याने बाजार समितीमधील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे. बाजार समित्यामध्ये होत असलेल्या कोट्यवधीच्या उलाढालीतून भ्रष्टाचार बोकाळल्याचे समोर आले आहे. या सर्व बाबीला बाजार समिती प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधीही कारणीभूत ठरत असल्याने या कारवाईवरून समोर आले आहे.

हिंगोली बाजार समिती हळद व इतर मालाच्या विक्रीसाठी मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. बाजार समितीची वार्षिक उलाढाल कोट्यवधींच्या घरात असल्याने सर्वच राजकीय पुढार्‍यांचे या बाजार समितीच्या व्यवहारावर विशेष लक्ष असते. बाजार समितीच्या निवडणुकीतही कोट्यवधींचा चुराडा करून संचालकपद पदरात पाडून घेतले जाते. दोन महिन्यांपूर्वी हिंगोली बाजार समितीचे सभापती हरिश्‍चंद्र शिंदे यांना 50 हजारांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. या कारवाईमुळे बाजार समितीच्या कारभारात असलेली अनियमितता समोर आली होती. 

लाच घेतल्यानंतर शिंदे यांना पुन्हा बाजार समितीच्या संचालक मंडळाने स्वाक्षरीचे अधिकार प्रदान करून कारभार करण्याची संधी दिली. शेतकर्‍यांची सातत्याने लूट करणार्‍या संचालक मंडळ व प्रशासनाच्या मुजोरीला सहकार विभागाने आवर घालण्याऐवजी पाठबळ दिल्याची घटना ताजी असताना बुधवारी कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे शासन नियुक्‍त सभापती संजय कावडे, सचिव जाधव, ग्रेडर गरड यांनी संगनमत करून 40 हजाराची लाच घेतल्याने पुन्हा एकदा बाजार समित्यामधील आर्थिक गैरव्यवहार चर्चेचा विषय ठरला आहे. सहकार कायद्यात असलेल्या पळवाटांमुळे हजारोंची लाच घेऊनही उजळ माथ्याने पुन्हा बाजार समितीचा कारभार पाहण्यास लाचखोर पुढारी मागेपुढे पाहत नसल्याचे या दोन उदाहरणांवरून समोर आले आहे.