Tue, Jul 23, 2019 10:30होमपेज › Marathwada › महामार्ग भूसंपादनाचा प्रश्‍न मार्गी

महामार्ग भूसंपादनाचा प्रश्‍न मार्गी

Published On: May 09 2018 2:02AM | Last Updated: May 08 2018 8:47PMबीड : प्रतिनिधी

सोलापूर-औरंगाबाद-धुळे या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बीड जिल्ह्यात सुरू आहे. या कामाला वारंवार भूसंपादनाचा ब्रेक लागला जात होता. त्यामुळे कामाच्या गतीसही अडचण येत होती. आता बीड जिल्ह्यातील चौसाळा ते खामगाव पर्यंतच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महामार्गच्या कामाला आता अधिक गती येणार आहे. 

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून भूसंपादनाचे वारे वहात आहे. राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे ट्रॅकच्या कामास गती मिळाल्याने शेतकर्‍यांना मावेजा देण्याचे व भूसंपादन करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. बीड जिल्ह्यातून सोलापूर-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावर हिरापूर ते खामगाव दरम्यान गेवराई तालुक्यातील 13 गावांचा समावेश आहे. या गावातील शेतकर्‍यांची आतापर्यंत 106 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून तालुक्यातून 27 कि. मी. चा महामार्ग जात आहे. तर, केवळ तीन हेक्टर जमिनीचे आणखी संपादन केले जाणार आहे. यासाठी शेतकर्‍यांना 179 कोटी 59 लाख रुपयांचा मावेजा देण्यात आला आहे. 

बीड तालुक्यात पारगाव ते चौसाळा या दरम्यान राष्ट्रीय महामार्गसाठी भूसंपादन करण्यात आले आहे. या कामासाठी 18 गावांमधील शेतकर्‍यांची जमीन संपादित होणार आहे. या हद्दीतून 51.22 कि.मी. महामार्ग होणार आहे. यासाठी 200 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. तर, आणखी 13 हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. यासाठी शेतकर्‍यांना तब्बल 431 कोटी रुपयांचा मावेजा वाटप करण्यात आला आहे. अगदीच थोड्या जमिनीचे संपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सुनावणीही सुरू आहे.