लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात सोमवारी दुपारी झालेल्या वादळी पावसाने पाच गावांत हाहाकार उडाला. वादळामुळे अडखळून पडल्याने नणंद येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. नारायण लादे (वय, ६०) असे वादळात सापडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या पावसात वीजा पडून दोन गुरेही दगावली आहेत.
सोमवारी दुपारी निलंगा, नणंद, मुदगड, माळेगाव व तांबरवाडी परिसरात तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. यावेळी लादे रसत्याने जात हाते. अचानक सुटलेल्या या वादळमुळे ते अडखळून जमीनीवर पडले आणि रक्ताची उलटी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
जोराच्या वाऱ्यामुळे लोखंडी विद्यूत खांब अर्ध्यातून वाकले, झाडे उन्मळून पडली, तारा तुटल्याने विद्यूत प्रवाह खंडीत झाला होता, पत्रे उडून काही अंतरावर जावून पडली, अनिल धोंडदेव यांच्या घरात वारे घुसल्याने घरांवरचे पत्रे उडाले. परिसरातील खरबूज, पपईच्या बागा आणि भाजीपाल्याला या वादळी पावसाचा फटका बसला.
दरम्यान, नुकसानग्रस्त गावाच्या नुकसानिची प्राथमिक पहाणी सुरू असल्याचे निलंग्याचे नायब तहसीलदार शिवाजी कदम म्हणाले. नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाप्रशासनास सादर केल्याचे तहसिलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले.