होमपेज › Marathwada › डॉक्टर मुलीच्या लग्नात वर्‍हाडींची आरोग्य तपासणी

डॉक्टर मुलीच्या लग्नात वर्‍हाडींची आरोग्य तपासणी

Published On: May 11 2018 1:39AM | Last Updated: May 11 2018 12:38AMगेवराई : प्रतिनिधी

हल्ली लग्न समारंभातून पर्यावरण व बेटी बचाव यासारखे विविध सामाजिक संदेश विवाह सोहळ्यातून किंवा लग्नपत्रीकेतुन दिले जातात  मात्र आरोग्यम् धनसंपदा या म्हणी प्रमाणे लग्नास येणार्‍या गरजु वर्‍हाडी  व पाहुण्यांची खुद्द डॉक्टर असलेल्या वधू-वरांकडुनच मोफत आरोग्य तपासणी आयोजित केली आहे.

बीड-गेवराई रस्त्यावर असलेल्या पेंडगाव येथील अंबादास जाधव या परिवारात सहा एमबीबीएस डॉक्टर आहेत. अतिशय कष्टातून त्यांनी आपल्या परिवारातील मुला-मुलींना शिक्षण देऊन डॉक्टर केले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे 46 छोटे मोठे उद्योग त्यांनी या काळात केले. अगदी मंदिरासमोर नारळ विकणे, किराणा दुकान, ब्रेड, खारी, विकणे, शेळ्या सांभाळणे आदी व्यवसाय करून त्यांनी मुलांना शिक्षण दिले. 

पुढे त्यांना स्टेट बँक ऑफ  इंडियात नोकरी लागल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत मिळाली. त्यांच्या चार मुलांपैकी रोहिणी, मोहिनी व योगेश डॉक्टर आहेत तर योगिनी शिक्षीका आहे. याबरेाबरच त्यांचे बंधू रामदास जाधव यांची मुलगा राजेश व मुलगी सोनाली दोघे एम. बी. बी. एस द्वितीय वर्ष, तर दुसरे  बंधू विनायक यांची कन्या वर्षा  व मुलगा दिनेश हे पण द्वितीय वर्षासाठी शिक्षण घेत आहेत.तीन भावांचे मिळून एकूण  6 एम. बी. बी. एस. आहेत. हे कुटुंब आता एम. बी. बी. एस.जाधव म्हणून परिचीत झाले आहे.

अंबादास जाधव यांच्या कन्येचा म्हणजे डॉ.रोहिणी हिचा विवाह आहे बाबूराव संपतराव पडोळ (रा. डोंगरगाव (दाभाडी), ता. बदनापूर जि. जालना)  यांचा मुलगा डॉ. योगेश सोबत ती विवाहबद्ध होत आहे. या लग्न समारंभातच वर्‍हाडी मंडळींची आरोग्य तपासणी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तर आरोग्यवर्धक भोजन दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत होणार आहे. याबरोबरच लग्न पत्रीकेतून जाधव परिवाराने लेक वाचवा अन् लेक शिकवा, स्वच्छता अभियान, वन संवर्धन, अन्न संवर्धन, जलसंवर्धन बळीराजास प्रोत्साहन व्यसनमुक्ती अशा विविध सामाजिक कार्यावरील उपक्रमांचे संदेश दिले आहेत.