Thu, Apr 25, 2019 12:06होमपेज › Marathwada › ..अखेर दैठणा शाळेचे मुख्याध्यापक भताणे निलंबित 

..अखेर दैठणा शाळेचे मुख्याध्यापक भताणे निलंबित 

Published On: Feb 01 2018 1:41AM | Last Updated: Feb 01 2018 12:26AMपरभणी : प्रतिनिधी

तालुक्यातील दैठणा येथील जि.प. के.प्रा. शाळेतील मुख्याध्यापकांची मनमानी शिक्षण विभागाच्या चौकशीत उघड झाली. याप्रकरणी दैठणा मुख्याध्यापकावर कारवाईची टांगती तलवार या मथळयाखाली दैनिक पुढारीत वृत्‍त प्रकाशित झाले होते. याची दखल घेत 31 जानेवारी रोजी सीईओ प्रताप सवडे यांनी मुख्याध्यापक आर.जे.भताने यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. 

या मुख्याध्यापकाच्या तक्रारीनंतर परभणीचे गटशिक्षणाधिकारी व्ही.बी. खोगरे, विस्तार अधिकारी चंद्रकांत मोरे, बी.व्ही. कापसीकर, केंद्रप्रमुख राठोड यांच्या पथकाने शाळेस भेट दिली. यावेळी शालेय समिती पदाधिकारी उपस्थित होते.  याप्रसंगी सर्वांसमक्ष मुख्याध्यापकांचा तोंडी खुलासा घेण्यात आला. यात अनेक प्रकारची अनियमितता आढळून आली. तसेच 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती व शिक्षण दिन कार्यक्रमाचे नियोजन होते. यावेळी मुख्याध्यापक भताने यांनी या दिवशी शाळेला सुट्टी देण्याबाबत शिक्षकांना भ्रमणध्वनीवरून सूचना दिली. तसेच तेही कुठलीही रजा न देता गैरहजर राहिले असल्याचे प्रशासनाला समजले. यातूनच भताने यांनी मुख्याध्यापक पदाची कामगिरी ही अनियमितता ठेवून केल्याचे निष्पन्‍न झाले. या सर्व प्रकाराची शहानिशा केल्यानंतर सीईओ सवडे यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा(शिस्त व अपील) नियम 1964 चे नियम 3 नुसार बुधवारी मुख्याध्यापक आर.जे.भताने यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

निलंबन काळात भताने यांना गंगाखेड पंचायत समिती हे मुख्यालय म्हणून राहणार आहे. तसेच या कालावधीत ते जर अर्धवेळ रजेवर असले तर त्यांना जेवढे वेतन मिळाले असते तेवढी रक्‍कम निर्वाह भत्‍ता म्हणून अनुज्ञेय राहणार आहे. यातच त्यांना कुठलीही शासकीय नोकरी अथवा खाजगी व्यवसाय करता येणार नसल्याचेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.