Thu, Jul 18, 2019 14:25होमपेज › Marathwada › २१ तरुणांनी केले मुंडण

२१ तरुणांनी केले मुंडण

Published On: Feb 02 2018 1:34AM | Last Updated: Feb 01 2018 10:11PMअंबासाखरः प्रतिनिधी

केज मतदार संघातील विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील सहा दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे, मात्र प्रशासनाने उपोषणाकडे लक्ष न दिल्यामुळे 21 कार्यकर्त्यांनी मुंडण करून शासनाचा निषेध व्यक्त केला. तर 40 ग्रामपंचायतींनी मुंदडा यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला असून, विविध पक्ष संघटना देखील या उपोषणामध्ये उतरल्या होत्या.

अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी केज मतदार संघातील विविध मागण्यांसाठी 27 जानेवारी पासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी 14 कार्यकर्त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना स्वाराती रुग्णालयात दाखल केले होते. बुधवार पासून नंदकिशोर मुंदडा यांची प्रकृती खालावत चालली तरी, प्रशासनाने कुठलीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे 21 कार्यकर्त्यांनी आपले मुंडण करत, शासनाचा निषेध व्यक्त केला, तसेच या संदर्भात कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण चौकात दोन तास रास्ता रोको केला. दरम्यान मंगळवारी महाबीज कार्यालयाने मुंदडा यांना लेखी आश्वासन दिले होते. या आश्‍वासनामध्ये कार्यालयाने जागा उपलब्ध झाल्यानंतर हा प्रश्न निकाली काढण्यात येईल असे म्हटले आहे, तसेच स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील विविध मागण्यांसाठी अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांनी लेखी स्वरूपात उत्तर देत, गुरुवारी आश्वासन दिले.

ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचे उपोषण पाठीमागे घेण्यात यावे यासाठी शिवसेनेचे माजी आ. प्रा. सुनील धांडे, माजी आ. बदामराव पंडित, जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी, तालुका प्रमुख प्रशांत आदनाक यांनी त्यांची भेट घेतली. माजी आरोग्यमंंत्री स्व.विमलताई मुंदडा यांचे पती नंदकिशोर मुंदडा यांनी मागील सहा दिवसांपासून उपोषण अंबाजोगाईत सुरू केले आहे.

या उपोषणाची दखल राजकारणातील विरोध बाजूला ठेवत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी नंदकिशोर मुंदडा यांच्याशी दूरध्वनीवर बातचित केली. त्यानंतर मुंडे यांनी आरोग्य मंत्र्याशी संपर्क साधत उपोषणातील मागण्या मान्य करण्यासाठी विनंती केली. त्यानुसार मुंडे यांच्या मध्यस्तीने आरोग्य खात्यातील सर्वच यंत्रणा जागी होत मुंदडा यांच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा एकवटली.