Tue, May 21, 2019 12:52होमपेज › Marathwada › वादळी पावसाने सर्वत्र उडाली दाणादाण

वादळी पावसाने सर्वत्र उडाली दाणादाण

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 09 2018 12:11AMबीड : पुढारी वृत्तसेवा

जिल्हाभरात शनिवारी व रविवारी सायंकाळी अवकाळी पावसाने दाणादाण उडविली. रविवारी आठवडी बाजारावरही पावसाने पाणी फिरविले. काही ठिकाणी फळबागांचे नुकसान झाले आहेत. तर, काही ठिकाणी जोरदार वार्‍याने झाडे उन्मळून पडली आहेत. 

शनिवारी दिवसभर उकाडा असला तरी रात्री मात्र वातावरण बदलले. बीड जिल्ह्यातील आष्टी, धारूर, केज, गेवराई, शिरूर, पाटोदा व बीड या तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला, तर काही ठिकाणी पाऊसधारा बरसल्या. काही भागात जोरदार वार्‍यामुळे झाडे उन्मळून पडली आहे. 

रविवारी दुुपारपर्यंत वातावरणात उकाडा होता, मात्र दुपारी तीननंतर वातावरण बदलले. अचानक आभाळात ढगांनी दाटी केली, तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट झाला. अजुनही काही ठिकाणी गव्हाचे पीक शेतात आहे, तर कोठे हरभरा काढणीचे काम सुरू आहे. बीड, गेवराई, शिरूर, माजलगाव या तालुक्यात फूल शेती व भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. एकतर सध्या भाजीपाल्याला चांगला दर नाही, त्यातच अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी दुुपारनंतर अचानक वार्‍याचा जोर वाढल्याने बीड व तालुुक्यातील साक्षाळपिंप्री, नेकनूर, आष्टी आदी ठिकाणच्या आठवडी बाजारात व्यापारी, ग्राहकांची एकच धांदल उडाली. वातावरण बदलल्याने बाजार चारपर्यंतच उरकल्याचे अनेक ठिकाणी  दिसून आले. 

बदलत्या वातावरणाचा शेतीकामांनाही फटका बसला. रविवारी सकाळपासून चांगले वातावरण होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी सकाळीच शेतीकामांची लगबग सुरू केली होती. गहू काढणी, हरभरा काढणी, खळे आदींची धांदल सुरू होती. असे असताना दुपारनंतर अचानक ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. यामुळे शेतकर्‍यांमध्ये भीती निर्माण झाली. अनेक शेतकर्‍यांनी दुपारी चार ते पाच दरम्यान घर गाठले.

पाटोद्यात घराच्या अंगणात पडली वीज

शहरात शनिवारी रात्री वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने एका घराच्या अंगणातच वीज पडल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने यामध्ये कसलीही जीवितहानी झाली नाही, मात्र अंगणामध्ये असलेल्या नारळाच्या झाडावर ही वीज पडल्याने झाड जाळून खाक झाले आहे. शनिवारी दुपार पासूनच शहरासह तालुक्यात वादळी वार्‍यासह पाऊस सुरू होता. रात्री 9 च्या सुमारास अनंत वैद्य यांच्या घराच्या अंगणात वीज पडल्याने एकच धावपळ उडाली. वीज पडल्याने अंगणातील नारळाच्या झाडाने पेट घेतला. जवळ जवळ 50 फूट उंच असलेल्या या नारळाच्या झाडास आग लागल्याने भीतीचे वातावरण तयार झाले होते. परिसरातील न उमर चाऊस, राजू जाधव,   सफदर शेख, प्रकाश  वीर, अजिंक्य बोरा, प्रतीक कांकरिया यांनी आग आटोक्यात आणली.

शिरूर तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी

तालुक्याच्या बहुतेक भागात रविवारी ढगाळ वातावरण होते. सकाळपासून उष्मा मोठ्या प्रमाणावर जाणवत होता. सायंकाळी ढगांचा गडगडाट सुरू झाला. मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, असे वाटत असताना सायंकाळी पाचच्या सुमारास शहरासह तालुक्यांतील बहुतांश भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. रायमोह येथे हरभर्‍या आकाराच्या गाराही  पडल्या. परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरण आणि उष्मा यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासून उकाडा जाणवत होता. सायंकाळी परिसरात ढगांचा गडगडाट सुरू झाला. यानंतर पाच वाजण्याच्या सुमारास शहरासह तालुक्यातील काही भागात हलक्या सरी पडल्या. जोरदार पाऊस येईल, या धास्तीने वाहनधारक आणि पादचारी यांनी घर गाठणे पसंत केले. प्रत्यक्षात मात्र तुरळक अशा हलक्या सरी पडल्या. रायमोह येथे मात्र, पावसाच्या हलक्या सरीबरोबरच हरभर्‍याच्या आकाराच्या गारा पाडल्या आहेत.